कोतुळ येथील मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे यांचा संगीत साधक पुरस्काराने गौरव!

कोतूळ, प्रतिनिधी :
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य बापूरावजी धामणीकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘संगीत साधक पुरस्कार’ यंदा अकोले तालुक्यातील कोतूळ येथील भूमिपुत्र, श्री अगस्ती ऋषी अध्यात्मिक गुरुकुल, अकोलेचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प. मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पानसरे गुरुजी यांच्या हस्ते पुणे येथील कोंढवा येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका सौ. रंजनाताई टिळेकर, उद्धव बापू शिंदे, ऋषी पानसरे, शिष्य परिवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
संकेत महाराज आरोटे हे वारकरी संप्रदायातील नामवंत मृदंग व पखवाज वादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. राज्यभर होणाऱ्या कीर्तन, भजन, हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पखवाज वादनाची साथ अत्यंत मानाची समजली जाते.

समाजप्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या झी टॉकीजवरील कीर्तन कार्यक्रमांनाही त्यांनी प्रभावी साथसंगत केली असून अनेक नामवंत कीर्तनकार व भजनसम्राटांसोबत ते सातत्याने संगीतसेवा बजावत आहेत.
संकेत महाराज आरोटे यांनी पखवाज विषयात विशारद, तबला वादनात विशारद तसेच संगीत विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. संगीत क्षेत्रातील त्यांची प्रामाणिक व निष्ठापूर्ण साधना, पखवाज वादनावरील उत्कृष्ट प्रभुत्व आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा मानाचा ‘संगीत साधक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे कोतूळ गावासह अकोले तालुक्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजप्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर, अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट, अकोलेचे अध्यक्ष ॲड. के. डी. आण्णा धुमाळ, विश्वस्त ह.भ.प. दीपक म. देशमुख, गणेश म. वाकचौरे, श्री. रामनाथ मुतडक, किरण म. शेटे, नितीन म. गोडसे, सोमनाथ म. भोर, रमेश म. भोर, प्रदीप भाटे, कुलदीप नेवासकर तसेच अकोले व संगमनेर तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



