श्री स्वामी समर्थांच्या रक्तचंदन पादुकांचे अर्नाळ्यात दर्शन!

विरार (पालघर) : अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र रक्तचंदन पादुकांचे २५ ऑगस्ट रोजी रात्री अर्नाळा, विरार (पश्चिम) येथील श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान मठात पावन आगमन होणार असून, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या माध्यमातून ‘स्वानंद सेवा सदन’ येथे दिव्यांग मुलामुलींच्या सर्वांगीण विकासाचे सेवाकार्य सुरू असून, याच वास्तूमध्ये स्थापन करण्यात आलेले “गजलक्ष्मी स्वरूप, कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान मठ” हे श्रद्धा, अध्यात्म आणि मानवसेवेचा संगम ठरत आहे.
भक्तपरंपरेनुसार, श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्या चोळप्पा महाराजांवर प्रसन्न होऊन त्यांना या पवित्र रक्तचंदन पादुका प्रदान केल्या होत्या. चोळप्पा महाराजांनी ज्या पवित्र चरणांवर आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, त्याच चरणांच्या या पादुकांचे दर्शन आता अर्नाळा येथे भाविकांना घेता येणार आहे. चोळप्पा महाराजांच्या पाचव्या वंशातील श्री अण्णू महाराज यांच्या माध्यमातून या पवित्र पादुकांचे अर्नाळा मठात आगमन होणार आहे.

२५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पादुकांचे पावन आगमन होणार असून, त्यापूर्वी रात्री ९ वाजता ह. भ. प. मधुरा प्रभू अनारेडी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अभिषेक, पूजा व दर्शन सोहळा होणार असून, सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. श्री राजेंद्र बुवा तावडे व श्री प्रशांत सोनावणे यांच्या भक्तिरसपूर्ण कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ ऑगस्टच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून घाण्याच्या बैलाचे व पंढरपूरच्या विठू माऊलींचे भव्य चलचित्र, कासवाची भव्य फुलांची रांगोळी, महाआरती आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्यामुळे अर्नाळा परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारून जाणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील भाविकांनी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र रक्तचंदन पादुकांचे दर्शन घेऊन या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठ संस्थापिका सौ. नूतन गुळगुळे व श्री विनायक गुळगुळे यांनी केले आहे.
स्थळ : श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान (मठ), फॅक्टरी पाडा, अर्नाळा, वसई – विरार (पश्चिम), जि. पालघर. अधिक माहितीसाठी सौ. मेघा घोडे (व्यवस्थापिका) : ८१४९४७४९९१, सौ. नूतन गुळगुळे (मठ संस्थापिका) : ९९२०३८३४४६ / ९८१९१४१९०६.



