लोणी येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा संपन्न

संजय उकिरडे /प्रतिनिधी
लोणी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त जयंती सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत संकुल, लोणी येथे बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर विद्यापीठ, साताराचे कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील, एकनाथराव घोगरे पाटील, उत्तमराव आहेर पाटील, जनार्दन घोगरे पाटील, सुधीरजी म्हस्के आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप डहाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख श्री. साहेबराव किरवे व श्री. दत्तात्रय खैरे यांनी केले. उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. जालिंदर सिनारे यांनी मानले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सचोटी, सातत्य, नियोजनबद्धता आणि आकलन क्षमता या गुणांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आधुनिक काळातील शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या संधी आणि विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने याविषयी त्यांनी अत्यंत मार्मिक व प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या सोहळ्यातून अधोरेखित झाला. वार्षिक पारितोषिक वितरणातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून जयंती सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संस्मरणीय ठरला.



