इतर

श्रीरामपूरचे जावई अभिनेता नाना पाटेकर यांच्या आठवणींचा ओलावा!

महादर्पण न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र भूमीचे कला आणि संस्कृतीभूषण असणारे चित्रपट, नाटक अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवार दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोवा येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आणि माणुसकीची हिरवळ कोमजली. ०१ जानेवारी १९५१ रोजी मुरुड – जंजिरा येथे जन्म झालेले नाना पाटेकर यांना ७५ वर्षाचे जीवनमान लाभले पण त्यांनी आपल्या कर्मसाधना आणि निर्मळ मनातील जाणिवेतूत मागे ठेवलेला आठवणींचा अमृतकुंभ सर्वांनाच जीवन पोषक आहे.
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांच्या मातोश्री संजनाताई पाटेकर व पिताश्री दिनकरराव पाटेकर यांच्या संस्काराखाली त्यांचे बालपण गेले. बालपणापासून धाडसी आणि चांगल्याला मदत करण्याची त्यांची वृत्ती सेवाभावी स्वरूपाची होती. संत तुकारामाप्रमाणे त्यांची सेवासाधना होती.
” जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा । देव तेथिची जाणावा ॥
मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥
ज्यांसी आपंगिता नाही । त्यासी धरी जो हृदयी ॥
तया करणे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥
तुका म्हणे सांगो किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥ “
नाना पाटेकर मला यांच्या जीवनकार्याचा संदर्भ अभ्यासता,अनुभवता ही भगवंताची मूर्ती मला दिसली. इतकं पवित्र आणि जनकल्याणासाठी समर्पित झालेले नाना पाटेकरांचे चरित्रजीवन अजरामर आहे.

लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोतुळ ता अकोले जिल्हाअहिल्यानगर येथील सुपुत्र सुरेशराव कोते यांच्या सोबत नाना पाटेकर यांच्या आठवणीचे क्षणचित्र


नाना पाटेकर व नीलकांती हालदुले यांचा विवाह १९७८ मध्ये झाला. नीलकांती यांचे वडील हालदुलेसाहेब हे महाराष्ट्र शुगर मिल डिस्ट्रिरली टिळकनगर येथे इक्ससाईज इन्सपेक्टर म्हणून नोकरीस होते. श्रीरामपूर येथील रेल्वेस्टेशन जवळील हॉटेल अर्चना, लक्ष्मी थिएटर परिसरात त्यांचे कार्यालय होते. नीलकांती ह्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेतले. नाना पाटेकर व नीलकांती यांचा विवाह झाल्याची आठवण स्वतः नाना पाटेकर यांनी सांगितली. ते १९ ८६ – ८७ या शैक्षणिक वर्षात बोरावके महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या विवाहाच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अप्पासाहेब पानवळ होते. वार्षिक स्नेहसंमेलनाचे चेअरमन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वैजूनाथ कुरणावळ सर, भौतिकशास्र विभागप्रमुख प्रा. ए. एच. म्हणजेच अनंतराव निकमसर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. सी. म्हणजे श्रीधर पाटील सर यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी नाना पाटेकरांचे स्वागत केले होते. या स्नेहसंमेलनात सचिन श्रीधर पाटील, नितीन श्रीधर पाटील या विद्यार्थ्यांचा नाना पाटेकरांच्या हस्ते सन्मान झाल्याच्या आठवणी सध्या सातारला राहत असलेले माजी प्राचार्य एस. सी. पाटील व प्राचार्य सौ. मंगलताई पाटील यांनी सांगितल्या.वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांचे मनमोकळं भाषण आणि श्रीरामपूरचे जावई या आठवणी अनेकांच्या स्मरणात आहेत. याविषयी प्रा. रामचंद्र राऊत यांच्याकडील फोटो, कात्रणे तसेच विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, प्रसार माध्यमातून
नाना पाटेकर यांच्या संदर्भाने बऱ्याच गोष्टी समजल्याचा आनंद फार मोठा आहे. श्रीरामपूरकरांना याबद्दल सार्थ अभिमान वाटतो. याविषयी आम्ही साहित्यिक आणि विविध व्यक्तींनी श्रद्धांजली प्रसंगी आठवणी महत्त्वाच्या असल्याचे सांगितल्या आहेत.

अभिनयातील नटसम्राट


नाना पाटेकर यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटके आणि विविध कलाक्षेत्रात अभियानात नाव लौकिक प्राप्त केला. १९७८ ते २०२६ या ४८ वर्षात त्यांनी केलेले अभिनयकार्य प्रभावी आहे. १९७८ मध्ये ‘गमन’ चित्रपटात प्रथम भूमिका केली. गिद्ध, भालू, शीला या चित्रपटातही त्यांनी प्रभावी ठसा उमटविला. राज बब्बरबरोबर त्यांनी आज की आवाज चित्रपटात सहनायक म्हणून काम केले. १९८२ साली अंकुश या चित्रपटात त्यांनी बेरोजगार युवकाची भूमिका केली ती लोकप्रिय ठरली. १९८७ साली प्रतिधात चित्रपटात प्रेक्षकांना त्यांची भूमिका आवडली. या चित्रपटात सुजाता मेहता नायिका होत्या. १९८९ साली परिंदा चित्रपटात खलनायक म्हणून त्यांनी काम केले. १९९२ चा तिरंगा हा चित्रपट आम्हा सर्वांना खूपच आवडला. राजकुमार आणि नाना पाटेकर यांची देशभक्ती आणि देशद्रोह्यांना त्यांनी शिकविलेला धडा प्रभावी वाटला. दोघांची संवादफेकशैली तोडीस तोड वाटली. २०१४ मधील प्रकाश बाबा आमटे हा त्यांचा चित्रपट आम्हाला फारच आवडला. कारण आम्ही प्राध्यापक, विद्यार्थी, मित्रपरिवार आनंदवन, सोमनाथ उन्हाळी शिबिरात भाग घेत असू. डॉ. बाबा आमटे, साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे परिवार यांच्या समवेत राहिलो, कामे केली. तेथील शिवसर आजही मित्र म्हणून संवादी आहेत. बाबा आमटे, साधनाताई कितीतरी वेळा ॲङ् रावसाहेब शिंदे यांच्या महादेव मळ्यात राहत असत. हा त्यांचा सहवास लाभला. दिवाळी साजरी केली.

श्रीरामपूर नगर पालिकेने त्यांचा सन्मान केली. प्राचार्य टी.ई. शेळके यांच्या कार्यकाळात कितीतरी वेळा महाविद्यालयात आले. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
रावसाहेब शिंदे यांच्यामळेच आम्हाला आनंदवन, आमटे परिवार परिचित झाले. त्यामुळे हा चित्रपट श्रीरामपूर येथील लक्ष्मी पॅलेस मध्ये सुरू झाला. आम्हा सर्व मित्र परिवारास प्रकाश बाबा आमटे चित्रपट डॉ. राजीव शिंदे यांनी स्वखर्चाने आम्हाला दाखविला. हा आनंद व अनुभव मनावर आजही ठसून आहे.
नाना पाटेकर यांची पुरुष, हमीदाबाईची कोठी या नाटकातील अभिनय भूमिका प्रभावी ठरली. दूरदर्शन मालिकेतही त्यांनी भूमिका केल्या. १९ ८८ मधील लॉर्ड माऊंटबेटन द लॉस्ट व्हाईसराय, १९९९ – २००० साली मिशन फत्तेह यात त्यांनी भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नटसम्राट मध्ये केलेली भूमिका अफलातून गाजली. त्यांच्या प्रभावी संवादफेक आणि रांगडा अभिनय मनावर कायमचा ठसला आहे.

सामाजिक बांधिलकी
नाना पाटेकर हे जसे नायक, खलनायक, सहनायक, दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी टिकविली. डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनला कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या. अनेक सेवाभावी संस्थांना मदत केली. सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर त्यांनी नाम फौऊंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी शेतकरी, ग्रामीण भागात, जलसंधारणांची अनेक कामे केली. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अपंग केंद्राला त्यांनी १९ जून १९९३ रोजी भेट दिली. मदत केली. कर्जुले भागातील कोकाटे झाप रस्त्या लगतच्या कौलारु घर असलेल्या वृद्ध आजीच्या घरातील उरलेली भाजी भाकरी नानांनी आवडीने खाल्ली. असा त्यांचा स्वभाव साधा, सरळ, निर्मळ होता, या संदर्भाचे अनेक किस्से आहेत. सैन्यात त्यांनी कॅप्टनची जबाबदारी सांभाळली. सैन्यात व्हि. के. सिंग यांच्या सहवासात ते राहिले. वरून दिसणारे कडक, शिस्तबद्ध नाना पाटेकर अंतरंगाने गोड होते. समाजाच्या भल्यांचा विचार करणारे ते खरे जननायक होते. आर. के. लक्ष्मण यांच्या संग्रहालयात मैत्रीपूर्ण चित्ररूपात आहेत. ते क्रीडाप्रेमी होते. नेमबाजी, क्रिकेटवीर यातही ते पारंगत होते. निसर्ग, पाणी, शेती, शेतकी, मायमाती, पशू, पक्षी, वृक्षवेली, नदी, ओढे, तलाव यावर त्यांचे प्रेम होते. या सर्वांना सांभाळा, प्रेम द्या, रक्षक बना, भक्षक नका बनू असे ते सांगत असत. एक बहुगुणी, बहुस्पर्शी, बहुअंगाने ते मृत्यूनंतरही सर्वांना परिचित आहेत. स्व. नाना पाटेकर यांच्या जीवन दर्शनाचे अनेक पैलू आहेत. तरीही माणुसकीचे सद्‌दर्शन घडविणारे हे व्यक्तिमत्त्व खरोखर पंचाहत्तरी नंतरही ताजे टवटवीत, हसरे आणि दिलखुलास जगले. यातूनच त्यांनी दिलेला हा आठवणींचा अमृतकुंभ आपण एक जीवन प्रेरक म्हणून जपूया.
अशी पाखरे येती, अनेक स्मृती ठेवनी जाती ।
दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती “
ही माणुसकीची , जीवनप्रेरक नाती अशीच जपूया. नाना पाटेकर यांच्या स्मृतीला हे भावपूर्ण शब्दनमन आहे.

…
डॉ. बाबुराव उपाध्ये, ,

श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
भ्रमणसंवाद : ९२ ७००८७६४०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button