अकोले येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न

अकोले | प्रतिनिधी
अकोले येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन मोठ्या भक्तिभावात पार पडले. परखतपूर रोडवरील श्रीमंत मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
सकाळी १० वाजता अकोले येथील बाजार तळ परिसरातून ढोल-ताश्यांच्या गजरात, अतिषबाजीच्या धूमधडाक्यात आणि फुलांनी सजवलेल्या रथातून पादुकांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा बस स्टॅन्ड, मध्यवर्ती चौक, महालक्ष्मी रोड मार्गे परखतपूर रोडवरील श्रीमंत मंगल कार्यालय येथे पोहोचली.
शोभायात्रेत राम-पंचायत देखावा तसेच संत शिरोमणी गजानन महाराजांचा जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरले. यावेळी संबळ वाद्य पथक आणि सनई-चौघड्याच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

यानंतर प्रवचन, पादुका दर्शन तसेच महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५०० जोडप्यांनी गुरुपूजन केले, तर ३११ उपासकांनी दीक्षा घेतली. यावेळी गरजू निराधार बेरोजगार महिलांना सामाजिक उपक्रमांतर्गत एकूण अकरा घरघंटीचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यकमास जिल्ह्यातून अनेक सामाजिक राजकीय व अध्यात्मिकक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

नाणीजधाम पीठाच्या वतीने वृक्षारोपण, वनराई कच्चे बंधारे, तसेच महामार्ग अपघातग्रस्तांसाठी मोफत ५३ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक कार्यांवरही भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पादुका दर्शन समितीचे पदाधिकारी, उत्तर अहिल्यानगर जिल्हा सेवा समिती, अकोले सेवा समिती तसेच असंख्य कार्यकर्ते व भाविकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.



