अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ ची कार्यकारिणी बैठक पुणे येथे संपन्न

पुणे, दि. 22 जून 2026 :
अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ (ABVMMS) ची अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक दि. 20 व 21 जून 2026 रोजी पुणे येथील सौदामिनी सभागृह, मंगळवार पेठ येथे यशस्वीपणे संपन्न झाली. बैठकीस देशातील विविध राज्यांतील प्रदेश महामंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, राज्य पदाधिकारी तसेच संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत देशातील विद्युत क्षेत्राची सद्यस्थिती, वीज कंपन्यांमधील कामगारांच्या समस्या, वाढते कंत्राटीकरण, संघटनात्मक विस्तार, सदस्यता वृद्धी, विविध राज्यांतील कामगार चळवळी व आगामी राष्ट्रीय कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यनिहाय सादर करण्यात आलेल्या अहवालांमध्ये खालील प्रमुख विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली :
- विद्युत क्षेत्रातील खासगीकरणाच्या योजना
- शेअर बाजाराद्वारे गुंतवणूक व विनिवेशाचे प्रस्ताव
- कंत्राटी व आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे प्रश्न
- रिक्त पदे न भरल्यामुळे निर्माण झालेली मनुष्यबळाची कमतरता
- वेतनातील विसंगती
- निवृत्तीवेतन व सामाजिक सुरक्षा विषयक अडचणी
- कर्मचारी सुरक्षा व आरोग्यविषयक प्रश्न
- कामगार संघटनांच्या मान्यतेचे प्रश्न
- नवीन श्रम संहितांची अंमलबजावणी
- विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या कामगार चळवळींचा आढावा
महाराष्ट्राच्या भूमीत आयोजित या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रेरणादायी प्रसंगाचा विशेष उल्लेख करण्यात आला.
मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रथम स्थानिक व दैनंदिन प्रश्न सोडवून जनविश्वास निर्माण करणे आवश्यक असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीतून मिळणाऱ्या या प्रेरणेच्या आधारे कामगारांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करून संघटनात्मक ताकद वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
बैठकीत राज्य संघटनांना खालील विषयांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले :
- वेतन विसंगती दूर करणे
- पदोन्नतीसंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविणे
- बदली व सेवा नोंदीतील त्रुटी दूर करणे
- कंत्राटी व आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे हक्क सुनिश्चित करणे
- सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे
- कर्मचारी सुरक्षा व कार्यस्थळावरील सुविधा वाढविणे
- रिक्त पदांची तातडीने भरती करणे
या विषयांवर प्रभावीपणे कार्य करून भारतीय मजदूर संघाची विचारधारा व धोरणे कामगारांपर्यंत पोहोचवावीत तसेच भविष्यातील व्यापक राष्ट्रीय आंदोलनांसाठी मजबूत पाया निर्माण करावा, असे महासंघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. मधुसूदन जोशी व अखिल भारतीय महामंत्री श्री. डी. राजामुरुगन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

उद्घाटन सत्रात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस श्री. सचिन मेंगाळे यांनी देशातील विद्युत क्षेत्रातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न, ओडिशातील कंत्राटी कामगार लढा , रोजगारातील स्थैर्य, समान कामास समान वेतन, सामाजिक सुरक्षा तसेच कंत्राटदारमुक्त रोजगार धोरण या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली.
राष्ट्रीय कार्यकारिणीने सर्व राज्य संघटनांना पुढील बाबींसाठी निर्देश दिले :
- नियमित प्रदेश कार्यकारिणी बैठका आयोजित करणे
- जिल्हा व युनिट स्तरावरील प्रश्नांचे संकलन करणे
- राज्यनिहाय सविस्तर कामगार समस्या अहवाल तयार करणे
- तातडीच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणे
- कामगारांशी थेट संवाद व संपर्क वाढविणे
राष्ट्रीय आंदोलनाची तयारी
विद्युत क्षेत्रातील खासगीकरण, विनिवेश, वाढते कंत्राटीकरण, आउटसोर्सिंग, कामगार हक्कांवरील आघात आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न या राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर महासंघ लवकरच एक समन्वित राष्ट्रीय कृती आराखडा व आंदोलन कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
राज्यांमधून प्राप्त होणाऱ्या मागण्या व समस्यांचे एकत्रित विश्लेषण करून राष्ट्रीय स्तरावरील पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

पुणे येथे झालेल्या या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमुळे अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाला नवीन दिशा, नवीन विचार आणि प्रभावी कार्ययोजना प्राप्त झाली आहे. कामगारांच्या दैनंदिन प्रश्नांपासून राष्ट्रीय धोरणात्मक विषयांपर्यंत सर्व स्तरांवर संघर्ष अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय सेक्रटरी श्री राधेश्याम जयस्वाल, विद्युत क्षेत्र प्रभारी श्री रविंद्र हिमते , वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल भालेराव, सरचिटणीस श्री. अरुण पिवळ, श्रीमती शर्मिला पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुभाष सावजी, श्री. धनंजय इनामदार, श्री. गद्रे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री. निलेश खरात तसेच विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अखिल भारतीय महामंत्री श्री. डी. राजामुरुगन यांनी उपस्थितांचे आभार मानले.


