इतर

नेप्तीत बैला बरोबर घोड्यांचा पोळा साजरा

दुष्काळ जाहीर करून छावण्या सुरू करा.- उपसरपंच एकनाथ जपकर व रामदास फुले यांची मागणी

अहिल्यानगर : प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नेप्ती व परिसरात पावसाअभावी पिके जळून चालली असून विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे . जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी शासनाने दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी छावण्या त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी नेप्ती गावचे उपसरपंच एकनाथ जपकर व सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केली आहे.

उपसरपंच एकनाथ जपकर यांनी बैलाबरोबर घोड्यालाही आकर्षक पद्धतीने सजवून ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत गावातून मिरवणूक काढून श्रावणी बैलपोळा दुष्काळाच्या सावटात उत्साहात साजरा केला. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने गावातील धार्मिक ऐक्याचे दर्शन घडले.

नेप्तीचे उपसरपंच एकनाथ आसाराम जपकर व जपकर कुटुंबीयांनी पोळा सण दिवाळी सारखा साजरा केला. त्यांनी शिस्तबद्ध मिरवणुकीचे आयोजन केले होते. वर्षभर ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण मोठ्या उत्साह साजरा केला . पिकांना मिळणारा कवडीमोल भाव आणि पावसाचा लहरीपणा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत असतानाही पारंपरिक सणाचा उत्साह कायम असल्याचे यावेळी दिसून आले.

पोळ्यानिमित्त बैलांना स्नान घालून शिंगांना व अंगाला रंग लावण्यात आला. मणी-माळ, वाशिंग फुगे आदींनी बैलांना सजविण्यात आले होते. बैलांच्या पाठीवर सामाजिक संदेशही देण्यात आले होते. बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांनी मातीच्या बैलांची, तर काहींनी ट्रॅक्टरची पूजा केली.

मिरवणूक हनुमान मंदिराच्या पटांगणात आल्यानंतर बैलांना मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली. बैलांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर घरी परतलेल्या बैलांची सुहासिनींनी विधिवत पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.

यावेळी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर, रामदास फुले, पुनम जपकर, संतोष जपकर, सुरेखा जपकर, आसाराम जपकर, बबई जपकर, कारभारी जपकर, गोरख जपकर, चेअरमन उमर सय्यद, अशोक जपकर, नसीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, शिवप्रतिष्ठान ग्रुप, आझाद ग्रुप, शिवछत्रपती मित्र मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button