अकोल्याचे विधिज्ञ के. डी. धुमाळ यांना जीवनगौरव पुरस्कार

‘आनंदोत्सव’चा राष्ट्रस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर
अकोले (प्रतिनिधी)-
अहिल्यानगर येथील गत सोळा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचा विशेष प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ २०२६ अकोले येथील अॅड. के. डी. धुमाळ यांना जाहीर झाला आहे. आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.
अहिल्यानगर येथे साहित्य आणि संस्कृति मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या अनुदानातून व आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग महाप्रकल्पाने संयोजित माऊली सभागृहात येत्या दि. २४ व २५ ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अॅड. धुमाळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अॅड. धुमाळ हे संस्कृती, कला व क्रीडा क्षेत्रात लक्षणीय कार्य करणार्या अजिंक्य क्रिकेट क्लबचे अध्यक्ष म्हणून, एक ख्यातकीर्त विधिज्ञ, अकोले नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष, पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ सामाजिक व सांस्कृतिक धुरीण व अकोले येथील विश्वाच्या केंद्रीय व्यवस्थापनासाठी लाखो वर्षांपासून कार्यरत असलेल्या महर्षी अगस्तिमुनी आश्रमाचे सेवाभावी अध्यक्ष आहेत. तसेच प्रवरा परिक्रमा या सांस्कृतिक व जल व पर्यावरणविषयक उपक्रमाचे मार्गदर्शक, तसेच साखर कारखाना, सहकारी सोसायट्या, दूध संघ आदि महत्त्वपूर्ण संस्थांच्या व्यवस्थापनात लोकधुरीण मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. वारकरी संप्रदायांतर्गत विविध उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य विशेष लक्षणीय ठरले आहे.
‘आनंदोत्सव’च्या पुरस्काराने यापूर्वी अयोध्या येथील राममंदिर न्यासाचे महासचिव स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, चार्टर्ड अकौंटंट सी. एल. मध्यान, कीर्तन केसरी सन्मानप्राप्त रंगनाथबुवा धर्माधिकारी, संगीततज्ज्ञ प्राचार्य डॉ. मधुसूदन बोपर्डीकर आदींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्काराबद्दल अॅड. के. डी. धुमाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


