नेप्तीतील बाळनाथ पुंड यांची कन्यादान पॉलिसी ठरली आधारवड , LIC कडून 18 लाखांचा आधार, 6 लाखांचा धनादेश सुपूर्द

अहिल्यानगर : प्रतिनिधी –
नगर तालुक्यातील नेप्ती गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे अपघाती निधन झाले आणि संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. मात्र, त्या पित्याने आपल्या चिमुकल्या लेकीसाठी काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या एका छोट्याशा पॉलिसीने आज त्याच्या कुटुंबाला 18 लाख रुपयांचा भक्कम आधार दिला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) पुन्हा एकदा आपण संकट काळातील सोबती असल्याचे सिद्ध केले आहे अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
नेप्ती येथील रहिवासी कै. बाळनाथ कानिफ पुंड हे कष्टकरी कुटुंबातील होते. त्यांना आपल्या कन्येच्या भविष्याची मोठी चिंता होती. माझ्या पश्चात माझ्या मुलीचे शिक्षण थांबू नये, या भावनेतून त्यांनी LIC चे विमा प्रतिनिधी सौ. कविता अंबादास पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या *95X शाखेत ‘जीवन लक्ष्य – कन्यादान’ पॉलिसी घेतली होती. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात कै. बाळनाथ पुंड यांचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले.
बाळनाथ पुंड यांच्या निधनाची माहिती मिळताच LIC च्या 95X शाखेने मानवतेच्या नात्याने तत्परता दाखवली.
त्यातील पहिला *6 लाख रुपयांचा व तीस हजाराचा धनादेश* नुकताच शाखा कार्यालयात एका भावुक कार्यक्रमात त्यांच्या पत्नी श्रीमती सोनाली बाळनाथ पुंड यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त एकदाच पैसे देत नाही, तर कन्येच्या शिक्षणाची जबाबदारी घेते.
1) तात्काळ 6 लाख रुपये रोख मदत म्हणून.
2) कन्येच्या शिक्षण व संगोपनासाठी दरवर्षी 30 हजार रुपये प्रमाणे पुढील 20 वर्षे – एकूण 6 लाख रुपये.
3) 20 वर्षांनंतर पॉलिसी पूर्ण झाल्यावर पुन्हा 6 लाख रुपये एकरकमी.
अशा प्रकारे एकूण 18 लाख रुपयांचा लाभ नेप्ती येथील पुंड कुटुंबाला मिळणार आहे.हा धनादेश वितरण सोहळा 95X शाखेत पार पडला. यावेळी वरिष्ठ शाखाधिकारी दिपक निकम, विकास अधिकारी यशवंत शिंदे, विकास अधिकारी अक्षय शिंदे, विमा प्रतिनिधी सौ .कविता अंबादास पुंड, नेप्तीचे माजी सरपंच अंबादास पुंड, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, प्राध्यापक भाऊसाहेब पुंड, सुनील शिरसागर , आदी उपस्थित होते. हा लाभ मिळवून देण्यासाठी विमा प्रतिनिधी सौ. कविता अंबादास पुंड यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
यावेळी बोलताना शाखा अधिकारी दिपक निकम म्हणाले, “बाळनाथ पुंड यांनी आपल्या मुलीसाठी दाखवलेली दूरदृष्टी आज त्यांच्या कुटुंबासाठी वरदान ठरली आहे. LIC ही केवळ विमा कंपनी नाही, ती प्रत्येक कुटुंबाचा आधार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासाठी विमा घेणे गरजेचे आहे.”
या घटनेमुळे विमा आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


