कृषी

शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा आणि कोरडे उपदेश नको :- शेतकरी दत्तात्रय पा. औताडे


श्रीरामपूर (वार्ताहर ) महाराष्ट्र शासनाने सर्वत्र दुष्काळ जाहीर झाला, ही योग्य दखल घेतली गेली आहे, त्यामुळे राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी येतात, बांधावरून पाहणी करतात परंतु आता शेतकऱ्यांसाठी केवळ वांझोट्या घोषणा आणि कोरडे उपदेश नको, तात्काळ मदत द्या, असे कळकळीचे आवाहन माळेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय परभतदादा पा. औताडे यांनी केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे शेतशिवार फेरी, शेतकरी सन्मान आणि सविस्तर शेतशिवार सविस्तर चर्चा आयोजित प्रसंगी श्री दत्तात्रय पा. औताडे तळमळीने बोलत होते. शेतीतील वाळलेली पिके, सडलेल्या शेंगा, कोरडे तळे, चाऱ्या आणि उपासमार भोगणारी जनावरे यांचे संदर्भ दाखवत औताडे पाटील म्हणाले, बैल गेला नि झोपा केला, वराती मागून घोडे असे होऊ नये, गावात, वृत्तपत्रात अथवा प्रसार माध्यमातून शेती, शेतकरी, पाऊस, दुष्काळ यावर बोलण्यापेक्षा तात्काळ शेतात प्रत्यक्ष येऊन वास्तव काय ते समजून घ्यावे, शेतकऱ्यांचे अश्रू आणि शेतीच्या, मातीच्या कोरड्या वेदना यांचे जवळून अनुभव घ्यावेत तरच शेतकऱ्यांचे खरे दुःख कळेल असे सांगितले. यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दत्तात्रय पा. औताडे, सौ. अनिताताई पा. औताडे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली, सौ. मंदाकिनी उपाध्ये, श्रीमती लक्ष्मीबाई उपाध्ये, प्रा. सौ. पल्लवी सैंदोरे, पवन उपाध्ये यांनी शेती, परिवार, परिसर यांची पाहणी केली. पाऊस नसल्याने शेतीतील पिकांची वाईट परिस्थिती आहे, ते पाहून शेतकरी, शेती वाचवा आणि जीव वाचवा असे त्यांनी आवाहन केले. सौ. अनिताताई पा. औताडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button