कृषी

नेप्ती मंडळात नुकसानीच्या पाहणीसाठी अधिकारी बांधावर,

एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही – मंडळ अधिकारी प्रताप कळसे.

अहिल्यानगर प्रतिनिधी

– नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव, हिवरे बाजार, टाकळी खातगाव, आणि निमगाव घाणा या दहा गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतात उभी असलेली पिके जागेवरच करपून गेली असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली असून, या संकटात एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, सर्व पंचनामे पारदर्शकपणे करून शासनाला अहवाल पाठवला जाईल, अशी ठाम ग्वाही नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांनी दिली. ते नेप्ती येथे दुष्काळी परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी बोलत होते.

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बाजरी, मका, सोयाबीन, तुर आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसाने अचानक पाठ फिरवली. नेप्ती मंडळात पाऊस कमी झाला . परिणामी पिकांना आवश्यक असलेले पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिकाची पूर्णपणे नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, सावकाराकडून पैसे घेऊन केलेली सर्व मेहनत वाया गेली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली नेप्ती मंडळासाठी १० विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम पंचायत अधिकारी यांचा समावेश आहे. ही पथके गावनिहाय आणि शिवारनिहाय प्रत्येक शेतात जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेत आहेत.

यावेळी बोलताना मंडळ अधिकारी प्रताप कळसे म्हणाले, बाधित शेतकरी एकही पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही गावनिहाय पथकांची नियुक्ती केली आहे. एकही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

नेप्ती येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समिती अहिल्यानगरचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी स्वतः शेतात उतरून करपलेल्या पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.याप्रसंगी नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे, नेप्ती ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा रांधवण, कृषी अधिकारी रावसाहेब नवले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, माजी संचालक वसंत पवार, माजी सरपंच संजय जपकर, अंबादास पुंड, नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब जाधव, मुख्याध्यापक बाबासाहेब भोर, प्राध्यापक मल्हारी कांडेकर, निंबळक ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दिवटे, बाळासाहेब कोतकर यांच्यासह नेप्ती, निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले म्हणाले, “दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना मंडळ अधिकारी स्वतः बांधावर आल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. अधिकारी बांधावर आल्याने आमच्या नुकसानीची खरी नोंद होईल. मंडळ अधिकारी कळसे साहेब यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळवून द्यावे. शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीचीच खरी गरज आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केले.

दरम्यान, प्रशासनाने सुरू केलेल्या प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्याच्या कार्यवाहीकडे नेप्ती मंडळातील सर्व १० गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेळेत आणि अचूक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button