शेणित येथे शनिवारी निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
शेणित : संत निरंकारी मिशनच्या राजूर ब्रांच अंतर्गत शेणित येथे शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मासिक निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा आध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे.
हा सत्संग सोहळा सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत शेणित येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी स्टेज सेवेची जबाबदारी प. आ. रामप्रकाश वर्मा जी सांभाळणार असून, मंच संचलनाची सेवा मारुती आसवले जी करणार आहेत.
सत्संगाच्या माध्यमातून मानवाला आध्यात्मिक ज्ञान, प्रेम, नम्रता, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश दिला जातो. सत्संगामुळे मनाला शांती मिळून जीवनात सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळते. ‘करेल सत्संग, त्याचे फुलेल अंतरंग!’ या संदेशातून सत्संगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
या सत्संग सोहळ्यास राजूर ब्रांच अंतर्गत येणाऱ्या सर्व संत-महात्म्यांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


