सुजित झावरे पाटील यांचे हस्ते काळकूप येथे ‘गरिबांची दिवाळी’ अंतर्गत गरजू कुटुंबांना शिधा वाटप

पारनेर | प्रतिनिधी
दिवाळी सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, गोरगरीब व गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘गरिबांची दिवाळी’ या सामाजिक उपक्रमांतर्गत आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर काळकूप येथे गरीब व गरजू कुटुंबांना शिध्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
दिवाळी हा आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे होत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

यावेळी सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले. गोरगरीब कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप कपाळे, स्वप्निल राहिंज, उद्योजक रवी खरमाळे, भागा कदम, नंदकुमार कदम, बाळासाहेब सालके, सुंदरदास कदम, महेश शिंदे व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

