मातीकला बोर्डाचे गठन व विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या आरक्षणासाठी लढा उभारू– प्रदेशाध्यक्ष संजय गाते

संजय उकिरडे
आळेफाटा (पूणे): सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या वतीने हॉटेल ज्ञानेश्वरी आळेफाटा पुणे येथे आयोजित विस्तृत राज्यव्यापी बैठकीत मातीकला बोर्डाच्या स्थापनेसाठी व विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या अभ्यास समितीने सुचविल्याप्रमाणे महसूल विभागाच्या २०२५ मधील परिपत्रकातील जाचक अटी व त्रुटी दूर करून नुकताच निर्गमित करण्यात आलेल्या ऐतिहासिक शासन निर्णयाचे बैठकीत स्वागत करण्यात आले. यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कुंभार समाजाच्या वतीने आभार मानले.
ते पुढे म्हणाले की, सर्व जिल्हाध्यक्षांनी शासन निर्णयाचा सूक्ष्म अभ्यास करून समाजातील तळागाळातील बांधवांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवावा. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गठित करण्यात येणाऱ्या ९ सदस्यीय शासकीय सनियंत्रण समितीसाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षाने अनुभवी व सक्रिय कार्यकर्त्यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवावीत.
२०१८ मध्ये श्री संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्ड व त्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती अद्याप हवेतच असल्याने समाजात असंतोष आहे. तसेच २०१९ मध्ये तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेच्या अभिभाषणातील मुद्दा क्र. ५० मध्ये, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार कुंभार समाजासारख्या वंचित समाजाच्या आरक्षणाची मागणी योग्य कालावधीत पूर्ण करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी शून्य असल्याची गंभीर दखल परिषदेने घेतली. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील संत शिरोमणी गोरोबा काकांच्या जन्मभूमी व समाधीस्थळाचा तीर्थक्षेत्र आराखड्यानुसार विकास करण्यासही शासनाला बाध्य करण्याची आग्रही भूमिका परिषदेने घेतल्याचे सांगितले.
तिन्ही मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३७२ तालुक्यांमध्ये संघटनेचा विस्तार व जनजागृती करून लवकरच जिल्हास्तरावर राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याची चेतावणी निवेदनासह शासनाला देण्यात येईल, असे गाते यांनी सांगितले.
बैठकीला संबोधित करताना प्रदेश सरचिटणीस सुभाष तेटवार यांनी संघटनात्मक रचनेची माहिती दिली. जिल्हा ते गाव पातळीवर कार्यकारिणी गठित करताना सुशिक्षित, समाजातील समस्यांची जाण असलेले तरुण, अनुभवी, अभ्यासू, कायद्याचे ज्ञान असलेले तसेच महिला सदस्यांचा समावेश करावा, असे ते म्हणाले. या माध्यमातून मासिक बैठकीसोबत वार्षिक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सुचविले.
प्रदेश उपाध्यक्ष चंदनलाल प्रजापती यांनी, मातीकला बोर्डाच्या स्थापनेमुळे कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाच्या विकासासोबतच सर्वांगीण विकासाची दारे खुली होतील, असा विश्वास व्यक्त केला. बोर्डाच्या स्थापनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक एकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोर कमिटी अध्यक्ष ॲड. संजय रुईकर म्हणाले की, आम्ही सर्व कुंभार भटक्या जमातीचे असून माती, पाणी, इंधन, जागा व रोजगाराच्या शोधात भटकंती करीत असल्याने आमच्या पूर्वजांचे मूळ गाव व आमचे सध्याचे वास्तव्य यात भिन्नता आहे. शासकीय गॅझेटमध्ये याचे पुरावे मिळतात. त्यामुळे राज्यपालांच्या २०१९ च्या अभिभाषणातील मुद्दा क्र. ५० नुसार आरक्षणाच्या मागणीसाठी अभ्यास समिती नेमून मागणी प्रभावी करावी, असे त्यांनी सुचविले.
प्रदेश उपाध्यक्ष कल्याण कुंभार यांनी समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासोबतच आयएएस अधिकारी घडविण्याचे आवाहन केले.
यावेळी विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास कोर कमिटी सदस्य म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नावे जाहीर करण्यात आली. यात पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाठक, साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार, श्री संत गोरोबा काका समाजोन्नती बहुउद्देशीय समितीचे सचिव डॉ. श्रीराम कोल्हे, निवृत्त अधिकारी शरद वाडेकर, प्रा. विजय कैथे, उमाजी सूर्यवंशी, नंदकुमार कुंभार, सौ. रसिका खेडेकर, महेश सायकर, कुंभार सेवा समाज पंचकमिटी अध्यक्ष राजीव खरे यांचा समावेश आहे.
तसेच नवनियुक्त पदाधिकारी म्हणून राजेंद्र अंबेरे (वीट व्यवसाय आघाडी सरचिटणीस), राजेश प्रजापती (प्रदेशाध्यक्ष, वीट व्यवसाय आघाडी), प्रदेश सचिव डॉ. संजय कुंभार, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुंभार,जिल्हाध्यक्ष पालघर भानुदास गोऱ्हेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. वैशाली विरारकर, जिल्हाध्यक्ष पुणे राजेंद्र जाधव, जिल्हाध्यक्ष अकोला रामचंद्र मेहरे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप आपतूरकर, सांगली जिल्हाध्यक्ष रमेश कुंभार, प्रदेश संघटक ॲड. वैजनाथ कुंभार लातूर जिल्हाध्यक्ष राजकुमार राजारूपे यांच्या नावांची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
बैठकीचा शुभारंभ प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक आरतीने झाला. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष व पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, सरचिटणीस रमेश बुरबांदे,संघटक ओमप्रकाश पांडे, महिला सदस्य चंद्रकलाताई चिकाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दै. लोकोन्नतीचे संपादक व प्रदेश सरचिटणीस उत्तमराव मांजरमकर यांनी केले. स्वागतपर भाषण प्रदेश सरचिटणीस संतोष दगडू कुंभार यांनी केले, तर आभार पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मानले.पसायदानानी कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला प्रदेश पदाधिकारी ओमप्रकाश पांडे, अविनाश ठाकरे,दै. महाराष्ट्र संकल्पचे संपादक दिलीप खांडेकर, गरीबदास मालधे, कृष्णाजी बोरसरे, अनिल धनोरे, ॲड. मंगळवेढे, रामचंद्र मेहरे, दिलीप आपतूरकर, सचिन इंगळे, चमनलाल प्रजापती, रितेश काशीकर, प्रेम चकबैस, गजानन बुरबांडे, प्रभाकर वालदे, ममता प्रजापती, रेखा राणे, सरला चिकाणे, गीता प्रजापती, रामलाल प्रजापती, नितीन प्रजापती, संजय वाडकर, अनिल गरपालीवर यांच्यासह जिल्हा अध्यक्ष व तालुका प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम ठराविक वेळेवर सुरू झाला.उपस्थितांचे धर्म दुपट्टा व कुंकू लावून स्वागत करण्यात आले.व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्याची उपस्थिती टाळण्यात आली.व्यासपीठावर फक्त प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आसनस्थ होते.पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्याचा अवडंबर मुद्दाम टाळण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुकाध्यक्षांची उल्लेखनीय उपस्थिती होती. मुद्देसूद विषय व वेळेची निश्चिती असल्याने भाषणे प्रभावी झाली.



