नाशिक येथे तीन दिवसीय आंतरजिल्हा रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड शिबिराचे आयोजन

युवकांमध्ये नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासाची रुजवण
नाशिक, दि. १५ नोव्हेंबर २०२६ :
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०६०, ३१३२ आणि ३०३० यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नाशिक येथील भोसला इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हेंचर अंजनेरी नाशिक येथे तीन दिवसीय आंतरजिल्हा रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड (इंटर डिस्ट्रिक्ट रायला) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नाशिक, धूळे, छ. संभाजी नगर,सोलापूर, वापी, सुरत इत्यादी शहरांतील सहावी ते बारावी या वयोगटातील एकुण ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे रोटरीच्या इंटरनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत आलेले मॅक्सिको आणि फ्रान्स येथील विद्यार्थी सुद्धा या शिबिरात सामील झाले होते.
सदर शिबिर भोसला एडवेंचर फाउंडेशन तर्फे अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एडवेंचर इन्स्टिट्यूट मध्ये घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना जंगलात प्रतिकुल परिस्थितीत कमीत कमी साधन सामग्री असताना सुरक्षित कसे बाहेर पडावे याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले. ट्रेकिंग, कयाकिंग , राफ्टिंग व कॅम्पिंगचा थरार या विद्यार्थ्यांनी प्रथमच अनुभवला.
या तीन दिवसीय एडवेंचर कार्यशाळेत भोसला एडवेंचर चे चैतन्य जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साहसी उपक्रमांचा अनुभव देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करणे, आत्मविश्वास वाढविणे, आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे, संघभावना, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत करणे यावर विशेष भर देण्यात आला.
साहसी उपक्रमांच्या माध्यमातून केवळ शारीरिक क्षमता नव्हे, तर मानसिक ताकद, सकारात्मक दृष्टिकोन आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. भविष्यातील जीवनात आणि करिअरमध्ये येणाऱ्या विविध आव्हानांना युवकांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि सक्षम नेतृत्व म्हणून पुढे यावे, हा या शिबिरामागील व्यापक दृष्टिकोन होता.
दि. १५ नोव्हेंबर रोजी या शिबिराचा समारोप तीनही रोटरी जिल्ह्यांचे प्रांतपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3060 चे गव्हर्नर निलेश शहा, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे गव्हर्नर जयेश पटेल आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख, प्रकल्प सचिव हेमराज राजपूत, डिस्ट्रिक्ट रायला को-चेअर रोटेरियन ओमप्रकाश रावत, रायला चेअर रोटेरियन वैशाली रावत, धुळे रोटरी क्लबचे महेश कुलकर्णी, अनिल पाटील, रेखा पाटील, सायली विरगावकर तसेच छत्रपती संभाजीनगर रोटरी क्लबचे चैतन्य धारूरकर, रेणुका पागे आणि सरिता लोनिकर उपस्थित होते.
समारोपप्रसंगी तीनही रोटरी जिल्ह्यांच्या गव्हर्नरांनी सहभागी युवकांशी संवाद साधला. युवकांनी भविष्यातील संधींचा लाभ घेताना नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी तीन दिवसांच्या शिबिरातील आपले अनुभव कथन केले. साहसी खेळांमधून मिळालेला आत्मविश्वास, नवीन मित्र जोडण्याची संधी, विविध जिल्ह्यांतील युवकांशी झालेला भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य धारुरकर यांनी केले.

