शिक्षणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज.- मा.आमदार वैभव पिचड

एकदरे आश्रमशाळेचे स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात
अकोले(प्रतिनिधी):-
विज्ञान जिथे संपते तिथून अध्यात्म सुरू होते. अंकांचा शोध जगात इतरत्र लागलेला असला तरी त्याची किंमत वाढते ती शून्याने आणि हा शून्य भारतातील आर्यभट्ट यांनी दिला.अध्यात्मा शिवाय विज्ञान व गणित पूर्णच होऊ शकत नाही.शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज असे प्रतिपादन अमृतसागर दूध संघाचे चेअरमन तथा आदी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
अकोले तालुक्यातील उन्नती सेवा मंडळ राजूर संचलित, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा एकदरे या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त हेमलताताई पिचड,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा साहित्य अभ्यासक संतोष दिवे,आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूरचे अध्यक्ष भरत घाणे,पंचायत समिती अकोलेचे माजी उपसभापती विठ्ठल भांगरे, सरपंच यशवंत बेंडकोळी,काळू भांगरे,बाळू साबळे,प्रतीक साबळे,माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक सुधीर कानवडे सर,माध्यमिक मुख्याध्यापक मा.विक्रम आरोटे,प्राथमिक मुख्याध्यापक प्रल्हाद नेहे,प्रभाकर येलमामे,सुदाम सदगीर,ज्ञानदेव पिचड,पी एस.भांगरे ,निवृत्ती भांगरे आदींजण व्यासपीठावर उपस्थित होते.

मा.आमदार वैभव पिचड म्हणाले की,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर,शाळेमध्ये विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रबोधन करणे आवश्यक आहे.भौतिक सुविधा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करून नवनवीन प्रयोग करावे.शिक्षणाशिवाय उन्नती नाही,शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आदरणीय मधुकरराव पिचड साहेबांनी आश्रमशाळांची व वाड्यावस्त्यांवर शाळांची निर्मिती केली.एकदरे आश्रमशाळेने आयोजित केलेल्या पालक मेळाव्याचे व वार्षिकस्नेह संमेलनाचे नियोजन उत्कृष्ट झाले असल्याचे ते बोलले.
युवा साहित्य अभ्यासक संतोष दिवे यांचे यावेळी पालकत्व या विषयावर व्याख्यान झाले. साने गुरुजींच्या जयंतीचे औचित्य साधून झालेल्या या व्याख्यानात साने गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून आजची पालकांची जबाबदारी ही प्रेरणा असावी असे त्यांनी सांगितले.
या शाळेतील झांज पथकाच्या नृत्य आविष्काराने मान्यवरांचे स्वागत झाले. यावेळी शाळेतील गुणवत्ता प्राप्त व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा सन्मान वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच परिसरातील पालकांचा व महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक ललित छल्लारे यांनी अकोले तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या जीवनावर शब्दबद्ध केलेल्या गीताचे अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे,माध्यमिक मुख्याध्यापक विक्रम आरोटे, काळू भांगरे.यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व पालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत काही निवडक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.स्वागतगीत,स्व.मधुकरराव पिचड साहेब श्रद्धांजली गीत,ये रामराज्य है,देशभक्तीपर गीत,कन्हैया,पपेट डान्स,आदी कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली.उपक्रमशील शिक्षक मच्छिंद्र शिंदे यांनी स्व.पिचड साहेब यांचेवर आधारित स्वरचित गीत सादर केले.वार्षिक स्नेहसंमेलन रात्री 8.00 वाजता सुरू करण्यात आले यामध्येही विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करत उपस्थितांनी बक्षिसांच्या रूपाने कार्यक्रमाला दाद दिली
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक विक्रम आरोटे यांनी शाळेच्या सद्यस्थितीबद्दल आढावा घेत शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार प्रशांत बगणर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रम आरोटे,प्राथमिक मुख्याध्यापक मा.प्रल्हाद नेहे,सांस्कृतिक विभाग प्रमुख दत्ता जाधव,अनिल नवले,ललित छल्लारे,मच्छीन्द्र शिंदे,तुकाराम चोखंडे,आसाराम कानकाटे,विरेंद्र शिंदे,प्रशांत बगणर,श्रीमती उर्मिला शेळके,मनिषा धिंदळे,वर्षा सोनवणे,अनामिका सोनवणे,सयाजी खाडे, यशवंत पोटकुले, लक्ष्मण चंदगीर,तुषार मादास,सचिन चंदगीर,हिराबाई भवारी,राधा गोडे,देशमुख यांनी प्रयत्न केले. संतोष दिवे यांनी काढलेली रांगोळी व मैदानात साकारलेला भारताचा नकाशा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार अनिल नवले यांनी मानले.


