सविता हासे(घोलप) यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

संगमनेर दि 1 साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
शिक्षक हेच समाजाची आदर्श पिढी घडवणारे शिल्पकार असून, त्यांच्याच कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने फाउंडेशन तर्फे दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावर्षीचा हा मानाचा सोहळा शिर्डीत पार पडला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री. विठ्ठलराव जपे, श्री. स्वरूप कापे, श्री. निखिल वामन व श्री. दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे व विश्वस्त श्री. अभिषेक तुपे यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
यावेळी श्रीमती.सविता माधव हासे (घोलप) यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणादायी अधिष्ठान मिळाले आहे



