महिलांच्या सक्षमीकरणात बंधन बँकेचे योगदान ऐतिहासिक.

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी:-
3 कोटी कष्टकरी आणि गरीब महिलांचे आर्थिक सक्षमीकरण बंधन बँकेने त्वरीत लघु अर्थसहाय्य देऊन केले . त्यामुळे या महिलांच्या परिवारातील सुमारे 18 कोटी वंचित नागरिकांसाठी शिक्षण – आरोग्यसह प्रगतीचे दरवाजे उघडले असल्याचे प्रतिपादन बंधन बँकेचे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड विभागाचे प्रमुख नीलांजन जरीयट यांनी केले.

बंधन बँकेतर्फे सामाजिक दायित्व योजनेतून ( CSR) देशभरात 18 दर्जेदार रुग्णवाहिका गरीब वंचितांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने घेतला . या उपक्रमाची सुरुवात स्नेहालय संस्थेच्या वैद्यकीय सेवा उपक्रमांसाठी सुसज्ज रुग्णवाहिका देऊन करण्यात आला.
यावेळी श्री.जरीयट, बँकेचे प्रादेशिक प्रमुख व्ही. एस. सुब्रमण्यन, अहिल्यानगरचे शाखा व्यवस्थापक विशाल लोंढे आणि अमित आढाव , स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष जया जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे, खजिनदार गीता कौर, मुख्य पालक राजीव गुजर , संचालक हनीफ शेख आणि अनिल गावडे आदी उपस्थित होते..

जरीयट यांनी यावेळी सांगितले की, आरंभी महिलांना रोजगार संधी आणि अर्थसहाय्य देणारी एक स्वयंसेवी संस्था चंद्रशेखर घोष यांनी वर्ष 2001 मध्ये सुरू केली.वर्ष 2014 मध्ये महिला सक्षमीकरणाची ही चळवळ त्यांनी बंधन बँकेत परावर्तित केली. श्री सुब्रमण्यम म्हणाले की, मागील 11 वर्षात भारतातील 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 6360 शाखांचे जाळे बँकेने विस्तारले. यातील 73% शाखा ग्रामीण महिलांसाठी कार्यरत आहेत. बँकेची अनामत मालमत्ता 1914.8 दशलक्ष कोटी रुपयांची असून बँकेत 1521 दशलक्ष रुपयांच्या ठेवी आहेत.
स्नेहालय आणि महिलांसाठी कार्यरत विविध सामाजिक संस्थांच्या सोबतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील कष्टकरी महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची योजना राबविण्यासाठी बंधन बँक सज्ज असल्याचे प्रतिपादन नगरचे शाखा व्यवस्थापक विशाल लोंढे यांनी सांगितले.



