आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी बटाटा पिक अभ्यास व प्रशिक्षण सहलीचा घेतला आनंद

एस के जाधव /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी बटाटा पिक अभ्यास व प्रशिक्षण सहलीचा आनंद शेतकऱ्यांनी घेतला
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई व बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत व गुरुदत्त ग्राम विकास समिती कोलटेंभे, प्रचिती राया ग्राम विकास समिती भंडारदरा, मोठादेव ग्रामविकास समिती रनद बुद्रुक, घोरपडा माता ग्रामविकास समिती रनद खुर्द, बजरंग बली ग्रामविकास समिती वाकी, उत्कर्ष ग्रामविकास समिती गुहिरे यांच्या माध्यमातून भंडारदरा, वाकी, कोलटेंभे, गुहिरे, रनद बुद्रुक, रनद खुर्द व वाकी या गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या वर्षी रब्बी हंगामात प्रकल्पामार्फत 50 शेतकऱ्यांना बटाटा बियाणे (कुफरी पूखराज वाण) देण्यात आले असून, त्यांच्यासाठी अभ्यास सहल व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
मंचर परिसरातील ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर बटाटा लागवड करण्यात येते, त्यांच्या शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष बटाटा प्लॉट पाहणी करण्यात आली. यावेळी बटाटा लागवड संदर्भात जमिनीची मशागत, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, रोग व कीड नियंत्रण याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

बटाटा पिकावर आढळणारे काजळी, बुरशी व करपा या रोगांचे नियंत्रण कसे करावे, कोणती औषधे वापरावीत यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच लागवडीवेळी घ्यावयाची काळजी, लागवडीनंतर चार ते पाच दिवस पाणी न देणे, बियाणे लागवडीपूर्वी बुरशीनाशकात बुडवून अर्धा तास सावलीत ठेवणे, लागवडीनंतर तण नियंत्रण व खुरपणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वाण निवड करताना कुफरी ज्योती व कुफरी पूखराज या वाणांची शिफारस करण्यात आली. तसेच बटाटा बियाण्याच्या ४, ६ व ८ साईजच्या गोळ्या बाजारात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

मंचर येथील पारेगाव, खेड, पेठ व गंगेवाडी या भागांमध्येही अभ्यास सहल घेण्यात आली. यावेळी श्री. संतोष नाना शीरसागर, बबन विठोबा भागडे, निलेश भागडे, भरत कडूसकर, जितेंद्र अशोक धुमाळ आदी शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून माहिती घेण्यात आली.
या अभ्यास सहलीसाठी प्रकल्पातून 29 शेतकऱ्यांचा सहभाग होता. सहलीचे नियोजन बायफचे श्री. राम कोतवाल, विष्णु चोखंडे, काजल देशमुख व मारुती सगभोर यांनी केले
—-=—-=



