नापास होण्याची भीती यशस्वी होऊ देणार नाही, त्याचा सामना करा – अरविंद गाडेकर

अपयश हे इतरांमुळे नाही तर , तुमच्या विचारांमुळे अडतं ,
मंगळेश्वर विद्यालयात, “कथाकथन” कार्यक्रम
संगमनेर प्रतिनिधी
– ” नापास होण्याची , अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही, त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. असफलता हि यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा. तुमचं आयुष्य , अपयश हे तुमच्यामुळे, तुमच्या विचारांमुळे अडतं , इतरांमुळे नाही. तुम्ही जितकं कमी ठेवालं तेव्हढच जग तुम्हाला कमी देईल. महात्मा गांधी, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईन हे देखील बालपणी शिक्षण घेत असताना नापास झालेले आहेत परंतु पुढे मात्र खूप मोठी व्यक्ती झालीत, आदर्श व्यक्तिमत्व झाली आहेत. साने गुरुजी, अब्राहीम लिंकन , थॉमस एडिसन अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यांना सुरवातीला अपयश आले, ते पुढे शिक्षण अपूर्ण राहिले पण त्यांनी लेखणी, वक्तृत्व आणि बुद्धी चातुर्याने जग जिंकले. त्यामुळे म्हणूनच तुम्हाला अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा ” असे उद्गार व्याख्याते, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी काढले.

मंगळेश्वर विद्यालय, मंगळापूर, संगमनेर आणि अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कथाकथन” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अरविंद गाडेकर यांनी कथेतून अनेक थोर व्यक्तिमत्वांची बालपणातील शिक्षण, नापास होण्याची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. या कथेतून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा आणि विद्यार्थ्यांमधील नापास होण्याची भीती दूर व्हावी यासाठी प्रबोधन केले. यावेळी काही निवडक व्यंगचित्र सादर करून विद्यार्थ्यांना हसविले आणि मार्मिक चिमटेदेखील काढले.
अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर या संस्थेविषयी संस्थेचे सदस्य मनोज साकी यांनी माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील काढणे, पवार दौलत आणि शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला




