इतर

नेप्ती शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान उत्साहात,


अहिल्यानगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांची वाचनाची सवय कमी होत चालली असताना, वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

. . या अभियानांतर्गत नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावातून भव्य ग्रंथदिंडी काढत वाचन संस्कृतीचा प्रभावी संदेश दिला.
ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक पालखी तयार करून त्यामध्ये विविध पुस्तके ठेवली होती.

गावातून फेरी काढताना विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. चौका-चौकात ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडीचे स्वागत करून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद अहिल्यानगर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत शाळेत आनंद वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

केडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान बोरुडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना नियमित वाचनासाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाची खास बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत वाचनासाठी योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांनी खाऊसाठीचे पैसे वाचवून शाळेला गोष्टींची पुस्तके भेट दिली. त्यामुळे वाचनालय अधिक समृद्ध होण्यास हातभार लागला असून, विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी आपुलकी निर्माण झाली आहे.
तसेच शाळेत एक अभिनव परंपरा सुरू करण्यात आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटण्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेला पाच पुस्तके भेट देणे आणि त्या दिवशी किमान एक पुस्तक वाचण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याला शैक्षणिक आणि सामाजिक मूल्य प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आशा ढोले, नुतन साळवे, बाळासाहेब नवले, सविता गोरे, बाळासाहेब कापसे ,माजी सरपंच दिलीपराव होळकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब होळकर, दत्ता कांडेकर, जमीर सय्यद, संतोष चहाळ,राजश्री कोल्हे, अनिता गव्हाणे, मिरा जपकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कवी कुसुमाग्रज यांच्या विचारांना अनुसरून राबविण्यात आलेले हे वाचन अभियान ग्रामीण भागात वाचन चळवळीला नवी दिशा देणारे ठरत आहे. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button