इतर

नेप्तीत हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त वरूण देवता पूजन व संवत्सर फल वाचन;

संवत्सर वाचनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते — पुरोहित अभिजीत औटी

अहिल्यानगर : प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नेप्ती येथे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सालाबादप्रमाणे श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्रीगणपती पूजन, इंद्रदेवता व वरूणदेवता यांची विधिवत पूजा ग्रामपुरोहित अभिजीत चंद्रकांत औटी ह्यांनी श्री.गोरख गडाख पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.

यानंतर ग्रामपुरोहित अभिजीत औटी यांनी परंपरेनुसार संवत्सर फल वाचन केले. यंदाचे स्वस्ति श्री मनरूप शालिवाहन शक १९४८ असून ‘पराभव’ नाम संवत्सर असल्याचे त्यांनी सांगितले. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी दिली.
औटी कुटुंबीयांची ही आठवी पिढी असून गावामध्ये ग्रामपुरोहित म्हणून नारायण औटी व अमोल औटी हे पौरोहित्याची परंपरा अविरतपणे जोपासत आहेत. संवत्सर वाचनासोबतच वार्षिक ऋतुमानातील बदल दाते पंचांगानुसार ग्रामपुरोहित अभिजीत औटी यांनी सविस्तरपणे उपस्थितांना समजावून सांगितले. या मार्गदर्शनामुळे बळीराजाला शेती नियोजनासाठी निश्चितच लाभ होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गुढीपाडवा या दिवशी संवत्सर फल वाचणे किंवा ऐकणे अत्यंत शुभ मानले जात असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, पुरोहित अभिजीत औटी, गोरख गडाख, भाऊ पाटील होळकर, माजी चेअरमन मच्छिंद्र होळकर, बबन सय्यद, नामदेव बेल्हेकर, सिताराम बेल्हेकर, अर्जुन बेल्हेकर, भिमराज कळमकर, ऋषी खामकर, विलास होले, बाबासाहेब ठुबे, गुलाब राऊत, पांडुरंग जपकर, रावसाहेब पुंड, मारुती चौगुले, दगडू होळकर, भाऊसाहेब जपकर, अशोक जपकर, बाबासाहेब रावळे, गोरख जपकर, एकनाथ चौरे, बंडू होळकर यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुढीपाडवा हा केवळ सण नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि शेतीशी निगडित जीवनपद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे. संवत्सर वाचनाच्या माध्यमातून वर्षभरातील पर्जन्यमान, ऋतू बदल आणि शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नियोजन करण्यास मोठी मदत होते. अशा परंपरा जपणे ही आजच्या काळात अत्यंत गरजेची बाब आहे. संवत्सर वाचनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व परंपरा जपणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अभिजित औटी यांनी केले आजच्या आधुनिक युगात विज्ञानासोबत पारंपरिक ज्ञानाचा संगम होणे आवश्यक आहे. संवत्सर वाचनासारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दिशा मिळते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतो. यासाठी गावकऱ्यांचा सहभाग आणि एकजूट हीच खरी ताकद असल्याचे ते म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button