इतर

छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”

मुंबई (दि 24) : जनरल एज्युकेशन सोसायटीच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छबिलदास शाळेत ‘अक्षीकर पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने पार पडला. संस्थेचे आद्य संस्थापक कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी २४ एप्रिल १८९२ रोजी स्थापन केलेल्या या संस्थेच्या मुंबईमध्ये दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, रायगड – उरण येथे मराठी, इंग्रजी माध्यमांसह व सीबीएसई पॅटर्न शाळा – महाविद्यालयांची एकूण संख्या ४९ इतकी असून अस शिक्षण क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा  लौकिक गौरव विस्तारात आहे. संस्थेची विचारधारा जपणाऱ्या आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्त कर्मचारी तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

हा सोहळा छबिलदास मुला-मुलींची शाळा, दादर येथील अक्षीकर-ताम्हाणे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी देवराज लालचंद राका अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर व माजी विद्यार्थी संजय घाडी, तसेच सनदी लेखापाल व माजी अध्यक्ष (ICAI) मुकुंद चितळे उपस्थित होते. याशिवाय कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र ताम्रस, उपकार्याध्यक्ष प्रदीप राका, उपकार्यवाह महेश केळकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. संस्थापक गोपाळ नारायण अक्षीकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत वृक्ष व भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करून एक अभिनव आणि मूल्याधिष्ठित सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या १३५ वर्षांच्या अखंड परंपरेचा उल्लेख करत, बदलत्या काळात शिक्षण संस्थांची भूमिका अधिक मूल्याधिष्ठित करण्याची गरज व्यक्त केली. “गुरु-शिष्य परंपरेतील मूल्यशिक्षणाची पुनर्स्थापना ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी संजय घाडी यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत, “शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त प्रेम आणि शिस्त रुजवतात. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणारी ही संस्था माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे,” असे सांगितले.

विशेष अतिथी मुकुंद चितळे यांनी शिक्षकांना सतत विद्यार्थी राहण्याचा संदेश देत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना ओळखून त्यांना फुलवण्याची प्रेरणा देणे, हेच खऱ्या शिक्षकाचे कार्य आहे. शिक्षक स्वतः शिकत राहिला, तरच विद्यार्थी प्रगतीचा मार्ग शोधू शकतो,” असे प्रतिपादन केले.

यावेळी विविध गटांतील ‘अक्षीकर पुरस्कार’ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षित पदवीधर गट : सौ. रंजना भरत पाटील (कल्याण सुभेदार वाडा हायस्कूल), प्रशिक्षित अ-पदवीधर गट : सौ. कृपा नितीन घाग (मोह विद्यालय, ठाणे), प्राथमिक विभाग : सौ. योगिता विलास कदम (छबिलदास हायस्कूल, दादर), आदर्श शिक्षकेतर पुरस्कार : श्री. प्रदीप काशिनाथ म्हात्रे (नेटिव्ह इन्स्टिट्यूशन, उरण), आदर्श मुख्याध्यापक : श्री. सतीश सोपान घोलप (न्यू हायस्कूल, कल्याण), आदर्श मुख्याध्यापिका : सौ. ज्योती ज्ञानेश्वर पाटील (इंग्लिश मीडियम स्कूल, उरण), आदर्श शिक्षिका पुरस्कार : सौ. सुनीता शैलेंद्र गुप्ता (ब्लॉसम इंटरनॅशनल स्कुल, डोंबिवली), यांचा गुणगौरव रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सौ. ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इतरही विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच संस्थेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणारा माहितीपट सादर करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अर्जिता कुलकर्णी, सुनील फर्डे, कल्याणी शितुत आणि सदाशिव कारळे, सई पटवर्धन व राहुल काकडे यांनी खुसखुशीत शैलीत केले. स्वागतगीत श्रीमती सुनेत्रा मिस्त्री यांनी सादर केले.

समारंभात उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत, शिक्षण क्षेत्रातील योगदानाची नवी दिशा निश्चित केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button