इतर

मिरजगावच्या संत सावता महाराज देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा !

📍 मुंबई | दि. २४ ऑगस्ट २०२६

अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील संत परंपरेतील श्रमसंस्कृतीचे अधिष्ठान असलेल्या श्री संत सावता महाराज देवस्थान ट्रस्टला शासनाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे देवस्थानाच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधा व आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र न राहता समाजप्रबोधन, सामाजिक एकता आणि प्रेरणेचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासोबतच देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

देवस्थानचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीने, पारदर्शक नियोजनाने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मिरजगाव येथे भव्य व प्रेरणादायी संत सावता महाराज मंदिर उभे राहील, असा विश्वास त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. या प्रयत्नांना आता यश आले असून श्री संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट, मिरजगावला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास विभागाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ’ योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा मंजूर झाला आहे.

या दर्जामुळे देवस्थानाच्या पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची निर्मिती, परिसराचे सुशोभीकरण तसेच तीर्थक्षेत्राचे जतन व संवर्धन यांना मोठी गती मिळणार आहे. त्यामुळे मिरजगावच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

विशेष म्हणजे, अरण येथील तीर्थक्षेत्र वगळता महाराष्ट्रातील संत सावता महाराजांच्या मंदिरांपैकी ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त करणारे मिरजगाव हे पहिले देवस्थान ठरले आहे. या निर्णयामुळे मिरजगावसह राज्यभरातील संत सावता महाराजांच्या भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुंबई येथील शासकीय निवासस्थानी संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज गुरुवर्य ह.भ.प. सावता महाराज वसेकर, ह.भ.प. प्रभु महाराज माळी, आबासाहेब खारे, नितिन खेतमाळस, मोनिका ताई काळे यांच्यासह समाजबांधवांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन आनंद व्यक्त केला व त्यांचा सन्मान केला. तसेच या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले.

या प्रसंगी ग्रामविकास विभागाचे खाजगी सचिव श्री. सुनील कोठेकर उपस्थित होते.

शासनाच्या ‘ब’ वर्ग दर्जामुळे मिरजगावच्या संत सावता महाराज देवस्थानाच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, भविष्यात हे देवस्थान राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button