अकोल्यात सर्प उद्यान मंजुर करा प्रमोद मंडलिक यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

अकोल्यात 80 दिवसांत तब्बल 131 जणांना सर्पदंश
अकोले प्रतिनिधी –
आदिवासी दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात सर्पदंश होऊन नागरिकांचे मृत्यु होत आहे. यासाठी विषबाधा पॅकेजचा पुर्नविचार करून अकोले हॉस्पिटलमधील तसेच आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील अडचणी दुर कराव्यात तसेच अकोल्यामध्ये सर्प उद्यान मंजुर करावे अशी मागणी अकोले नगरपंचायतचे माजी नगरसेवक, अकोले शिवसेनेचे कार्याध्यक्ष प्रमोद मंडलिक यांनी केली आहे.
याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांना प्रमोद मंडलिक यांनी निवेदन दिले असुन, त्या निवेदनात म्हटले आहे कि अकोले तालुका हा अतिदुर्गम असुन, आदिवासी व दुर्गम भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. या विषबाधेच्या रूग्नांना सेवा देतांना आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत काम करतांना अडचणी येतात, त्या दुर होणे आवश्यक आहे.
याबाबत सर्पदंशावर कमीत कमी खर्च सुमारे 1 लाखापर्यंत येत असतांना त्यासाठीचे पॅकेज अवघे 43 हजार रूपयांचे आहे. त्यामुळे पॅकेजच्या खर्चाबाबत सुधारित पॅकेज घोषीत करून त्यानुसार रूग्नांना उपचारासाठी रक्कम अदा करण्यात यावी. तसेच रूग्नांना मॉनिटरींग करण्यासाठी अतिदक्षता विभागाची आवश्यकता असल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात 5 दिवस अतिदक्षता विभागात रूग्नांना ठेवले जाते. मात्र त्यांना जनरल वार्ड प्रमाणे पॅकेज घेण्याचे सांगितले जाते. मग वरील आर्थिक भार अकोले तालुक्यातील आदिवासी, गोरगरीब जनता सोसणार कसा? असा सवालही त्यांनी केला.
याबाबत आरोग्य मंत्री अबिटकर यांना तातडीने आरोग्य सेवेचे आयुक्त यांना आदेश देऊन याबाबत त्वरीत कार्यवाही करावी असे सुचविले आहे. यामुळे लवकरच आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नवीन पॅकेज चा समावेश होईल असा आशावाद अकोले नगरपंचायतचे माजी नगरसेवक, अकोले शिवसेनेचे कार्याध्यक्ष प्रमोद मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.
तसेच अकोले तालुका हा आदिवासी व डोंगराळ तालुका असुन, येथे शेतकरी, शेतमजुर मोठ्या प्रमाणात आहेत. ऐन पावसाळ्यात 80 दिवसांत तब्बल 131 जणांना सर्पदंश झाला असुन, त्यातील काही रूग्ण दगावले देखील आहेत. तरी याबाबत योग्य ती उपाययोजना करावी तसेच सर्प उद्यानास मंजुरी द्यावी, त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असेही मंडलीक यांनी सुचविले आहे.


