सातबारा नोंद दुरुस्तीसाठी ४ लाखांची लाच मागणारा तलाठी अँटी करप्शन च्या जाळ्यात!
मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५
दौंड तालुक्यातील देलवडी येथील घटना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
दौंड (पुणे) : खरेदी केलेल्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल चार लाख रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला अखेर दोन लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
. ही कारवाई सोमवारी (ता. १० नोव्हेंबर) बोरीपार्धी (ता. दौंड) येथे करण्यात आली असून या घटनेने दौंड महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
रंगेहात पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव दीपक नवनाथ आजबे (वय ३९, रा. फ्लॅट नं. १८, आनंद हेरिटेज, बोरीपार्धी, मूळ गाव – खापर पांघरी, जि. बीड) असे आहे. आरोपी हा वर्ग-३ लोकसेवक असून देलवडी (ता. दौंड) येथे कार्यरत होता. येथे गट क्र. १५०६ मधील ०.०६ आर क्षेत्र खरेदी केले
होते. मात्र, जुलै २०२४ मध्ये संगणकीय सातबारा उतारा काढल्यावर नोंद ०.०३ आर अशी चुकीची दिसली. त्यानंतर तक्रारदाराने ही दुरुस्ती करण्यासाठी तलाठी दीपक आजबे यांच्याकडे अर्ज दाखल केला. या अर्जावर काम करून देण्यासाठी आजबे यांनी सुरुवातीला ४ लाख रुपयांची लाच मागितली, त्यानंतर ३ लाखांवर तडजोड दाखवली, आणि
शेवटी २ लाख रुपयांत व्यवहार ठरला. ही रक्कम स्वीकारताना त्यास रंगेहात पकडले
या प्रकरणी आरोपी तलाठी दीपक आजबे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे या करत आहेत.
या कारवाईमुळे महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला असून, भ्रष्टाचारावर गदा आणणारी ही कारवाई ठरली आहे.


