रोटरी क्लब ऑफ नाशिकचा बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार अभय सुपेकर यांना जाहीर;

मंगळवारी वितरण- पत्रकारांचाही होणार सन्मान
नाशिक : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर यांना चौथा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष साबळे यांनी दिली. येत्या मंगळवारी (दि. ६) रोजी सायंकाळी पाच वाजता रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
गेल्या ८१ वर्षांपासून रोटरी क्लब ही संस्था समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत समाजाभिमुख काम करणाऱ्या या संस्थेने आजवर नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. विशेषत: ग्रामविकासावर भर दिला आहे. या कार्यात माध्यमांचे योगदानही महत्त्वाचे राहिले आहे. म्हणूनच समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून रोटरी क्लबतर्फे मागील चार वर्षांपासून पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ संपादक असलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्याच्या भावनेतून दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. हा चौथा पुरस्कार दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक सकाळचे माजी संपादक संचालक तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
श्री. सुपेकर यांनी वयाच्या १९८८ पासून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली होती. गेल्या साडेतीन शतकाहून अधिक काळ ते दैनिक सकाळ वृत्तपत्रात कार्यरत आहेत. आपल्या निर्भिड आणि समाजभान जपणाऱ्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात येत्या मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास माध्यम क्षेत्रातील मान्यवर तसेच नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, सचिव रेखा पटवर्धन, मकरंद चिंधडे, जनसंपर्क संचालक विद्युलता तातेड, मंथ लीडर भूषण अमृतकर, रेणुका गोरीयंतल, मंथ डायरेक्टर मोना सामनेरकर आदींनी केले आहे.



