संगमनेर तालुक्यात प्रथमच रोबो रेस स्पर्धा संपन्न

संगमनेर | दि. ११ जानेवारी
अविनाश सर स्किल्स सेंटर, संगमनेर आणि व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ROBO RACE COMPETITION 2026, ही अत्यंत नाविन्यपूर्ण, तांत्रिक व प्रेरणादायी स्पर्धा रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास शिंदे, (विभागप्रमुख – ऑटोमेशन व रोबोटिक्स, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर), तसेच डॉ. नामदेवराव गुंजाळ, (अध्यक्ष, विद्या विद्यापीठ), अविनाश सर स्किल्स सेंटरचे संस्थापक श्री. अविनाश सूर्यवंशी, उपक्रमाचे समन्वयक इंजिनीअर संतोष रहाणे आदि मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर शहरात प्रथमच अशा स्वरूपाची रोबो रेस स्पर्धा आयोजित करण्याचा आनंद वेगळाच असून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, नवसर्जनशील विचार आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास निर्माण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री. अविनाश सूर्यवंशी यांनी सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नमूद केले.
अतिथी मनोगतात डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी मैत्री ठेवून नाविन्यपूर्ण प्रयोग करावेत, असे आवाहन केले. तर डॉ. विलास बी. शिंदे यांनी रोबोटिक्स व ऑटोमेशन क्षेत्रातील भविष्यातील संधी, तसेच अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान व संशोधनाची आवड निर्माण होत असल्याचे सांगितले.
सदर स्पर्धेमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील एकूण १६ संघांनी स्वतः तयार केलेल्या रोबोट्सद्वारे सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे प्रथम बक्षीस ₹11,000 Velox, संगमनेर संघाच्या हर्षवर्धन खरात व यश देशमुख यांनी पटकावले, तर द्वितीय बक्षीस ₹7,000 प्रवरा पब्लिक स्कूल, लोणीच्या Tanaji Warriors संघातील यश बस्ते व अथर्व एकशिंगे यांनी पटकावले.
कार्यक्रमाचे आभार समन्वयक श्री. संतोष रहाणे यांनी व्यक्त केले, तसेच रोबो रेस सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता व संघभावना विकसित होईल अशा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अब्बास पठाण यांनी केले. सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अविनाश सर स्किल्स सेंटरच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
ROBO RACE COMPETITION 2026 ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी आणि भविष्यातील अभियंते घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



