कामगारांच्या प्रश्नांवर भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यां समवेत महत्त्वपूर्ण बैठक.

मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२६ :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आज ‘वर्षा’ शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे भारतीय मजदूर संघ (BMS) च्या प्रतिनिधी मंडळाची विविध कामगार विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत दि. १६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय मजदूर संघाने काढलेल्या मोर्च्यानंतर शासनास सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विविध मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. भारतीय मजदूर संघाच्या मागण्यांवर शासनस्तरावर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीत भारतीय मजदूर संघाने नवीन लेबर कोडमधील कामगारविरोधी तरतुदींबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. कामगारांच्या हिताला बाधा आणणाऱ्या तरतुदी रद्द करण्यात याव्यात तसेच लेबर कोडच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
राज्यात कर्मचारी राज्य विमा (ESI) योजना प्रभावीपणे राबविणे. बोनस पात्रता मर्यादा ₹४२,००० पर्यंत वाढविणे. राज्य शासनांतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करणे. कामगार कपात नुकसानभरपाईची मर्यादा ६० दिवसांपर्यंत वाढविणे. EPS निवृत्तीवेतनधारकांना किमान ₹२,००० मासिक पेन्शन देण्यासाठी पाठपुरावा करणे. भगवान श्री विश्वकर्मा जयंतीला शासकीय सणाचा दर्जा देणे. विडी कामगारांना किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करणे. राज्यातील विविध कामगार मंडळे व समित्या तातडीने स्थापन करून त्यामध्ये भारतीय मजदूर संघाला योग्य प्रतिनिधित्व देणे. माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळाशी संबंधित प्रकरणे दिवाणी न्यायालयाऐवजी कामगार न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदल करणे. घरेलू कामगार, बांधकाम कामगार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, फेरीवाले, वीज कामगार, वीज कंत्राटी कामगार, विमानतळ टॅक्सी चालक, इंडियन एअरलाईन्स रोजंदारी कामगार, लिपिक संघ, एसटी महामंडळ, सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेन्शन, बचत गट संस्था निधी, मेट्रो कामगार आदी विविध क्षेत्रांतील प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठका आयोजित करणे.या मागण्या मांडण्यात आल्या

बोनस पात्रता मर्यादा ₹४२,००० करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कर्मचारी राज्य विमा (ESI) संदर्भात स्वतंत्र बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल.
भगवान श्री विश्वकर्मा जयंतीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनस्तरावर अंतर्गत बैठक घेऊन भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींशी पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात येईल. वीज उद्योगाशी संबंधित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले
या बैठकीस भारतीय मजदूर संघाच्या वतीने अखिल भारतीय सचिव ॲड. अनिल ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. किरण मिलगिर, विदर्भ प्रदेश महामंत्री श्री. गजानन गटलेवार आणि सहक्षेत्र संघटन मंत्री श्री. मोहन येणुरे उपस्थित होते.
शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. श्रीकर परदेशी, श्री. महेश पोहणेरकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


