गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा; डीजेचा दणदणाट टाळा!

पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याचे शंकर गायकर यांचे आवाहन
अहिल्या नगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गणेश मंडळांच्या मिरवणुका, ध्वनिप्रदूषण आणि उत्सव काळातील सुरक्षा व्यवस्थेबाबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य अबाधित ठेवणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत गायकर यांनी यावेळी व्यक्त केले.
गणेश मंडळांनी डीजेचा वापर मर्यादित ठेवावा आणि पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम व इतर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण, वाहतुकीला अडथळा किंवा नागरिकांना त्रास होणार नाही, याची मंडळांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
“गणेशोत्सवाची ओळख दणदणाटाने नव्हे, तर भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याने झाली पाहिजे. उत्सव साजरा करताना त्याचे धार्मिक व सामाजिक पावित्र्य प्रत्येकाने जपले पाहिजे,” अशी भूमिका शंकर गायकर यांनी मांडली.
यावेळी गणेश विसर्जन मिरवणुका, गर्दीची ठिकाणे, वाहतूक नियोजन, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच संवेदनशील भागातील बंदोबस्त याबाबतही चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले. सोशल मीडियावरील अफवा, अपप्रचार अथवा चिथावणीखोर संदेशांवर विश्वास न ठेवता अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी विश्व हिंदू परिषद, गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मंदिर अर्चक-पुरोहित संपर्क आयामाचे विभाग प्रमुख गजेंद्र सोनवणे, श्री वरदविनायक देवस्थान कोतूळचे अध्यक्ष प्रदीप भाटे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यालय मंत्री मुकुल गंधे उपस्थित होते.


