इतर

जलसमृद्धी प्रकल्पाने बदललीसिन्नर तालुक्यातील शेतीची दिशा!

‘महिंद्राच्या‘ सीएसआर निधीतून ‘बायफ‘ने केलेली कामे बघून द्विवेदी प्रभावित

सिन्नर दि 24
पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, भूजल पुनर्भरण वाढवणे आणि साठवलेल्या उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, या उद्देशाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या परिणामकारक कामांमुळे सिन्नर तालुक्यात शेतीची दिशाच बदलली आहे. काठोकाठ भरलेले नाले, उंचावलेली भूजलपातळी अन् भाजीपाल्याच्या पिकांनी बहरलेला हिरवागार शिवार बघून महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड मुंबई कंपनीचे CSR अधिकारी प्रभावित झाले. दुष्काळी टापूतील विविध गावांमध्ये जलसमृद्धी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडत असून, महिंद्रा कंपनीने यासाठी सीएसआर निधी दिला आहे. ‘बायफ लाइव्हलीहूड्स‘ संस्थेच्या माध्यमातून झालेली ही लोकोपयोगी कामे बघून, सीएसआर हेड अविलाश द्विवेदी अत्यंत प्रभावित झाले.

सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर, देवपूर आणि मळढोण येथे जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी महिंद्रा अँड महिंद्राचे सीएसआर हेड अविलाश द्विवेदी यांनी केली. बायफ लाइव्हलीहूड्स आणि ग्राम विकास समितीच्या कामाचे द्विवेदी यांनी कौतुक केले. या कामांमध्ये ग्रामस्थांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग, कामांचा दर्जा आणि त्यातून दिसून येणारे सकारात्मक परिणाम पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. स्थानिक गरजा लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

पाणी व्यवस्थापनासाठीचा हा प्रकल्प महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या सहकार्याने बायफ लाइव्हलीहूड्सच्या माध्यमातून २०२५ पासून राबविण्यात येत आहे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, भूजल पुनर्भरण वाढवणे आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

२०२५-२६ या वर्षात १६ शेततळी पूर्ण करण्यात आली. तर आणखी पाच शेततळ्यांसाठी लायनिंग शीट आणि कंपाउंडसाठी मदत करण्यात आली. या शेततळ्यांमधून सुमारे १९५ लाख लिटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली असून, १६.२ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता उपलब्ध झाली आहे. याच वर्षात एका ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. नाला खोलीकरण आणि रुंदीकरण उपचारातून ७६ लाख लिटर अतिरिक्त पाणीसाठा आणि भूजल पुनर्भरणाची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे १८ हेक्टर क्षेत्र रब्बी सिंचनाखाली आणण्यास मदत झाली आहे.

पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी ३१ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच देण्यात आले. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी ३० लाख लिटर पाण्याची बचत होण्याची क्षमता निर्माण झाली आहे. चालू वर्षातही जलसंधारणाची कामे सुरू आहेत. सहा शेततळ्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित आहे. त्याचा सुमारे १५० शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. यावर्षी २७ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच देण्यात आले आहेत. तसेच चार ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.

पावसाच्या पाण्याने भरलेल्या या नाल्यांमधील पाणी जमिनीत मुरत असल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. शेतजमिनीतील ओलावाही टिकून राहत असून, उपलब्ध पाण्याच्या आधारे शेतीचे नियोजन अधिक परिणामकारक होत आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याची उपलब्धता, सिंचन क्षमता आणि भूजल पुनर्भरणात सुधारणा झाली आहे. प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या क्षमतावृद्धीलाही महत्त्व देण्यात आले असून, ८५ शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, कार्यक्षम सिंचन, पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य आणि शाश्वत शेतीविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कामांची पाहणी करताना द्विवेदी यांनी ग्रामस्थांशी आणि ग्राम विकास समितीच्या सदस्यांशी संवाद साधून प्रकल्पाच्या उपयुक्ततेची माहिती समजून घेतली. ग्रामस्थांच्या सहभागामुळे जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारक झाली असून, पाणी आणि शेतीशी संबंधित स्थानिक प्रश्न सोडविण्यास या उपक्रमांची मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बायफतर्फे मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक प्रदीप खोसे, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाणे, महेश लांडगे, ईश्वर आभाळे,शुभम नवले, अगस्ती चासकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button