कर्मवीरांच्या ज्ञानगंगोत्रीमुळे बहुजन समाज शिक्षण घेऊ शकला :- डॉ. बाबुराव उपाध्ये

संजय उकिरडे /प्रतिनिधी
पारनेर – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला तर त्यांचे निधन ०९ मे १९५९ रोजी झाले. ० ४ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, यामागील कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांच्या ज्ञानगंगोत्रीमुळेच बहुजन समाज शिक्षण घेऊ शकला, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती टाकळी ढोकेश्वर येथील प्रभाकरराव गणपतराव पा. खिलारी विद्यालयात संपन्न झाली,
त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री पंडितराव झावरे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी प्रा. शिवाजीराव बारगळ उपस्थित होते. प्रा. डॉ. सुनील प्रभाकरराव पा. खिलारी यांच्या नियोजनाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी श्री तारकराम पा. झावरे, माजी प्राचार्य माधवराव गायके, श्री सुभाष काका पा. खिलारी, माजी प्राचार्य सीताराम पा. दुस, श्री किसनराव पायमोडे आदिंची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कर्मवीर अण्णा, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, स्व. प्रभाकरराव पा. खिलारी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी लेझिम आणि वाद्ये संगीतातून विद्यार्थी – विद्यार्थिंनी , कर्मचारी, पदाधिकारी समवेत गावातून कर्मवीर प्रतिमेची मिरवणूक संपन्न झाली. उपशिक्षक कर्ण रोकडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. उपशिक्षिका जयश्री पवार – खंडागळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

कर्मवीरांच्या कमवा आणि शिका योजनेमुळे गरीब रयत शिकली : – प्रा. शिवाजीराव बारगळप्रमुख पाहुणे प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी कर्मवीर अण्णांचे जीवनकार्य सांगून ते म्हणाले, कर्मवीरांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र जपून संस्थेत कमवा आणि शिका योजना सुरु केली, त्यामुळेच गरीब रयत शिक्षण घेऊ शकली. त्यांनी श्रमप्रधान शिक्षणप्रणाली आणली, श्रम आणि ज्ञान यांची जोड असेल तरच खरे शिक्षण होते. आम्ही श्रमातूनच शिक्षण घेतले असे सांगून टाकळी ढोकेश्वर येथील शाखेला आर्थिक मदतीची खरी गरज असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वसतिगृहातील मुलींच्या पाच डबल बेडसाठी ६५ooo रुपयांचा चेक प्रा. डॉ. सुनील पा. खिलारी यांना प्रदान केला. तसेच प्राचार्य माधवराव गायके, सुभाष काका पा. खिलारी, प्रा. वामन रामदास, ॲङ् लुमेश्वरी खिलारी यांनीही प्रत्येकी पाच बेडची देणगी प्रदान केली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या अनाथ जीवनाची कथा-व्यथा सांगून कर्मवीर झाले म्हणून आम्ही अनाथ मुले शिक्षण घेऊ शकलो, कर्मवीरांचे अनंत उपकार असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणातून पंडितराव पा. झावरे यांनी कर्मवीर अण्णांचे मोठेपण सांगून गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही फक्त शिक्षण घेण्याची डॉ. उपाध्ये यांच्यासारखी जिद्द हवी असे सांगितले. डॉ. उपाध्ये यांनी शिक्षक, मुले यांचा पुस्तके देऊन सन्मान केला. उपशिक्षिका संध्या थोरात, उपशिक्षक प्रविण राऊत, सुनील शिंदे, अरविंद वाघ, अमोल भोंडवे, लेखनिक संदीप भिंगारे यांनी कार्यक्रम नियोजनात भाग घेतला. उपशिक्षिका जयश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले तर कर्ण रोकडे यांनी आभार मानले.



