कृषी

केंद्रीय पथकाकडून नगर तालुक्यातील दुष्काळाची पाहणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या- – रामदास फुले

अहिल्यानगर : प्रतिनिधी–

नगर तालुक्यातील दुष्काळाने आता गंभीर रूप धारण केले आहे. याची दखल घेत केंद्र सरकारच्या केंद्रीय पाहणी पथकाने आज चास आणि निमगाव वाघा येथे भेट देत प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन पाहणी केली. पिकांची झालेली राखरांगोळी पाहून पथकही हळहळले.


पथकाने चास येथे सोयाबीन, बाजरी आणि कांदा पिकांच्या शेतात पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत, बाजरीचे कणीसच भरले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनवारी करून उभी केलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

निमगाव वाघा येथील देवी पाच नंबर तलावाने तळ गाठला
निमगाव वाघा येथील देवी तलाव हा शेतीची जीवनरेखा आहे. मात्र यंदा या तलावात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. तलाव कोरडा पडल्याने रब्बीचा हंगामच धोक्यात आला आहे.

यावेळी शेतकरी रामदास फुले यांनी केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांची व्यथा अत्यंत परखडपणे मांडली.

“साहेब सर्व पिके जळून गेली आहेत.* आम्ही सोयाबीनसाठी बियाणे, खतासाठी सावकाराचे कर्ज काढले. पण पावसाने दगा दिला. सोयाबीनची झाडे गुडघ्यापर्यंतच राहिली, शेंगा लागल्याच नाहीत. बाजरीचे पीक जळून काडी झाली आहे.

या देवी तलावाच्या पाण्यावर शेती जगते, पण तलावात आता पाणीच नाही. शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. आम्हाला आता चारा-पाणी विकत घ्यावे लागत आहे. हातातोंडाशी आलेला घास दुष्काळाने हिरावून घेतला आहे.

सरकारने फक्त पाहणी नको, तर तातडीने पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी. चारा छावण्या सुरू कराव्यात, जनावरांच्या पाण्याची सोय करावी, नाहीतर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आमचे उपजीविका फक्त शेतीवर आहे, शेतीच गेली तर आम्ही जगायचे कसे?” मुलांना शिकवायचे कसे ?


जनावरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शासनाने दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई, चारा छावण्या आणि टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केली .

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, राज्याचे कृषी आयुक्त सुरेश मांढरे ,विभागीय कृषी संचालक काटकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मिलिंद कुलथे,मंडळ अधिकारी महसूल प्रताप कळसे, तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके, मंडळ कृषी अधिकारी अश्विनी भुजबळ, जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता व्ही.एस.संदुपटला ,सहाय्यक कृषी अधिकारी रमेश खाडे, रावसाहेब नवले, ग्राम महसूल अधिकारी विनायक दिक्षे, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पानसंबळ, शेतकरी अरुण कापसे, रामदास फुले ,भारत फलके, वसंत फलके, दिपक फलके, भाऊसाहेब जाधव, चेअरमन अतुल फलके ,नवनाथ जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पाहणीचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला सादर केला जाणार असून या अहवालानंतर केंद्राकडून किती मदत येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button