इतर

न्यू इंग्लिश स्कूल, सुपा येथे वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनासाठी प्राचार्य मंगेश जाधव यांचा पुढाकार;

संजय उकिरडे /प्रतिनिधी

सुपा, ता. पारनेर : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, सुपा येथील प्राचार्य श्री. मंगेश जाधव यांनी वृक्षारोपण उपक्रमात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने विद्यालयाच्या शालेय परिसरात हा वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात प्राचार्य श्री. मंगेश जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसमवेत प्रत्यक्ष वृक्षारोपण करून शालेय परिसर हिरवागार करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावला. शाळा ही केवळ ज्ञानदानाची जागा नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, निसर्गप्रेम आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी निर्माण करणारे संस्कारकेंद्र आहे, या भूमिकेतून त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

यावेळी डॉ. बाळासाहेब पठारे, डॉ. शत्रुघ्न मगर, डॉ. सुभाष डेरे, डॉ. रमेश गवळी, डॉ. अजय येणारे, डॉ. अतुल हंडोरे, डॉ. धनंजय पठारे, डॉ. हनुमंत घायाळ आणि डॉ. प्रतीक श्रीमंदीलकर यांनी वृक्षारोपण केले.

वृक्षारोपणातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची सवय लागावी, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण संदेश आहे. प्राचार्य श्री. मंगेश जाधव यांच्या सक्रिय सहभागामुळे शालेय परिसरातील पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले.

वृक्षलागवड करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लावलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. या उपक्रमातून “एक विद्यार्थी–एक वृक्ष, वृक्षसंवर्धनाची आयुष्यभराची जबाबदारी” असा सकारात्मक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा मिळाली.

पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल, सुपा विद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button