इतर

प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे मालपाणी विद्यालयात स्वच्छतेविषयी मार्गदर्शन


संगमनेर : येथील मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयात ४ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय व्यंगचित्रकार पुरस्कार प्राप्त संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे ‘एक पणती स्वच्छतेची’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम एरंडे आणि कलाशिक्षक संतोष गोरे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनातून अरविंद गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व अतिशय सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितले. आपण चॉकलेट, बिस्किटे खातो आणि त्यांचे रॅपर निष्काळजीपणे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकून देतो. मात्र, प्रत्येकाने असे केले तर त्यातून किती मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो, याचा आपण कधी विचारच करत नाही, असे त्यांनी सांगितले. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते पर्यावरणासाठी किती घातक आहे, याचीही त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
स्वच्छता ही केवळ शासनाची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. आपण स्वतः स्वच्छतेची सुरुवात केली, तर त्याचा परिणाम समाजावरही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात आणि शाळेत स्वच्छतेची एक पणती लावावी, स्वतः कचरा करू नये आणि इतरांनाही कचरा न करण्याबाबत जागरूक करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छतेचा हा विचार केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कलाशिक्षक संतोष गोरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने घ्यावयाची काळजी यांची जाणीव झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कलाशिक्षक संतोष गोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button