टाकळी केंद्र शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

अकोले:- सालाबादाप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे स्वराज्याची संस्कारशाळा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची ४२८ वी जयंती तसेच थोर समाजसुधारक राष्ट्रपुरुष महान योगी स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी शाळेचे ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्री. दत्तात्रय देवगिरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उंचखडक खुर्द शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. वाकचौरे उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी केले. सहशिक्षिका श्रीमती संगिता धिंदळे व निता लेंभे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या दोन महान विभूतींच्या जयंतीनिमित्त शाळेतील लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या निबंधलेखन स्पर्धांचे नियोजन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्राला उजाळा देत अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त केली. सहशिक्षक संजय देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.



