अकोल्यात ६९ पर्यवेक्षक ४५८ प्रगणक जनगणनेसाठी सज्ज.

अकोले प्रतिनिधी
देशाच्या भविष्यासाठी विकासाचा पाया ठरणारी जनगणना मोहीम आता वेग घेत असून अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.या मोहिमेसाठी एकूण ४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रगणक व पर्यवेक्षक जनगणनेसाठी सज्ज झाले आहे.
यावर्षी ही जनगणना पारंपरिक कागद पेनऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने माहिती अधिक अचूक,सुरक्षित आणि वेगवान पद्धतीने संकलित होणार आहे. ही जनगणना अकोले तालुक्याचे तहसिलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
तालुक्यातील सर्व प्रभागांची जबाबदारी प्रगणकांवर सोपविण्यात आली असून,ते प्रत्येक घरापर्यंत जाऊन माहिती संकलित करणार आहेत.जनगणना मोहिमेबाबत मार्गदर्शन करताना तहसिलदार डॉ.सिद्धार्थ मोरे,नायब तहसीलदार किसन लोहरे तसेच महसूल सहाय्यक भाऊराव डगळे यांनी विविध सूचना देत मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी प्रशासनाने नागरिकांसाठी स्वयं-गणना सुविधा देखील उपलब्ध करून दिली असून नागरिकांना ऑनलाईन पोर्टलवर जाऊन स्वतःची माहिती स्वतः भरता येणार आहे. त्यामुळे प्रगणकांचा वेळ वाचून काम अधिक सुलभ होणार आहे.प्रगणक जेव्हा नागरिकांच्या घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र असणार आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अचूक माहिती देऊन या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यावेळी तहसिलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्ड ट्रेनर प्रा. संतोष नवले, प्रा.सचिन लगड, प्रा.शशीकांत लेंभे, प्रा.आदेश बांगर, प्रा. जुबेर बागवान, प्रा.शुभम बोरसे, प्रा.विठ्ठल कवटे, प्रा. श्रीराम देशमुख आदींनी प्रगणक तसेच पर्यवेक्षकांना जनगणना मोहिमेचे प्रशिक्षण देण्यात आले.जनगणना प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष फिल्डवर प्रशिक्षण देण्यात आले.जनगणना २०२७ अंतर्गत १६ मे ते १४ जून दरम्यान पार पडणार आहे असे प्रशासनाने सांगितले आहे.ह्या मोहिमेच्या माध्यमातून तालुक्यातून निवडलेले अधिकारी प्रत्यक्ष घरापर्यंत जाऊन सखोल तपासणी करून माहिती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
जनगणना दोन टप्यात होणार असून पहिला टप्यात इमारत/ घरगनणा करायची आहे.ही प्रक्रिया जलद व पारदर्शक असून हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने अचूक माहिती नोंदवणे आवश्यक आहे.प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षमपणे माहीती संकलित करून जनगणना यशस्वी होईल-
डॉ. सिद्धार्थ मोरे तहसिलदार
==========


