इतर

नाशिक- पुणे रेल्वेसाठी हजारो नागरिकांचा अभूतपूर्व रास्ता रोको

तीन तास चक्काजाम आंदोलन, वाहनांच्या लांबच लांब रांगा

नाशिक -पुणे सरळ रेल्वेच्या अत्यंत चांगल्या कामाला कुणी खोडा घातला ? –माजी मंत्री बाळासाहेब थोरात

भाऊसाहेब वाकचौरे

महादर्पण प्रतिनिधी

नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी एकत्र येत तीन तास ठिय्या आंदोलन केले. नागरिक महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे घोषणांच्या निनादात तीन तास चक्काजाम आंदोलन झाले.

यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या हायस्पीड रेल्वे मार्गाकरता केंद्र व राज्य सरकारच्या सर्व मंजुरी मिळालेल्या असताना हे चांगले काम थांबले कसे असा सवाल करताना. जेथे रेल्वेचे काम थांबले तेथूनच काम सुरू करा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्य सरकारला केले असून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली आहे. तरुणाईचा एल्गार असलेल्या आंदोलनाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पाऊस येथे सर्वपक्षीय नागरिक महिला युवक विद्यार्थी शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य रास्ता रोको झाला तीन तास झालेल्या या रास्ता रोको साठी संगमनेर अकोल्यातून अनेक नागरिक उपस्थित होते. रेल्वे आमच्या हक्काची , नाशिक पुणे सरळ रेल्वे झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दुमदुमला. रिमझिम पावसामध्ये ही हजारो नागरिक तीन तास रस्त्यावर बसून होते.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक पुणे सरळ रेल्वे करता आपण सातत्याने पाठपुरावा केला. 2019 मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिक पाठपुरावा करताना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुद्धा यामध्ये मदत केली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार, रेल्वे या सर्व विभागांच्या या सरळ मार्गासाठी मान्यता मिळालेले आहेत. राज्य सरकारने 1000 कोटी रुपये रेल्वेला दिले त्यानंतर भूसंपादन सुरू झाले. गोल्डन ट्रँगल साठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सरळ रेल्वे मार्गाचे काम थांबण्याचे काय कारण आहे ते कळत नाही. या अत्यंत चांगल्या कामात कुणी खोडा घातला. हा सवाल करताना सर्व मंजू-या मिळताना जीएमआरडी ची कोणतीही अडचण आली नव्हती. आताच अडचण आली कशी असा प्रश्न त्यांनी केला.

याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण यांचे नाव न घेता त्यांनी साईबाबांचा चांगल्या कामाला आशीर्वाद असतो चांगल्या कामात कुणी राजकारण करू नये अशी टीका केली तर काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाही अशी नाव न घेता टीका त्यांनी अमोल खताळ यांच्यावर केली.

शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रति आम्हाला आदर आहे. परंतु समिती नेमून पुन्हा शून्यापासून काम सुरू होणार आहे त्यामुळे झालेले काम वाया जाणार आहे. समिती आली म्हणजे धोका आहे .हा खेळ जनतेच्या भावनेशी आहे विकासाशी आहे.

या सरळ रेल्वे मार्गामुळे देशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे .येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजक ,विद्यार्थी, तरुण यांना मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भविष्यातील पिढ्यांच्या विकासासाठी होणाऱ्या या रेल्वेमध्ये कोणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे आवाहन करताना ही रेल्वे मार्गे सरळच झाली पाहिजे याचबरोबर जेथे रेल्वेचे काम थांबले तेथूनच सुरू करा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे केली आहे.

पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की मी कलावंत म्हणून नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करत आहे. हे संगमनेरच्या प्रवरेचे पाणी आहे. संगमनेरचे रक्त आहे. ते थांबत नाही. आमची प्रगती कोणी थांबू शकत नाही. सरळ रेल्वे मार्गासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आहेत. साईबाबा आमच्या हृदयात आहेत भावनिक शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. बस झाली तुमची दिशाभूल करण्याची पद्धत. हक्काची रेल्वे मिळाली पाहिजे असा सांगताना विकासाला कोणी अडवा येत असेल तर त्याला आडवा करा असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

तर मा आ डॉ सुधीर तांबे म्हणाले की, नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग हा नैसर्गिक आहे मात्र संगमनेर तालुक्याचा विकास थांबवण्यासाठी काही मंडळींनी जाणीवपूर्वक या मार्गामध्ये बदल केला आहे. संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी संगमनेरच्या बाजूने कधी बोलत नाहीत. हा लढा भविष्यातील पिढ्यांसाठी असून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. रेल्वेमुळे विकासाचा मोठा टप्पा गाठला जाणारा असून केंद्र सरकारने जनतेचा आवाज ऐकून तातडीने सरळ मार्गे रेल्वे करावी असे आवाहन त्यांनी केले

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, नाशिक पुणे सरळ रेल्वे हे स्वर्गीय अजित दादांचे स्वप्न होते. राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सुद्धा या कामासाठी अधिक लक्ष दिले पाहिजे. चांगल्या कामांमध्ये राजकारण नको जनतेच्या हिताचे राजकारण करा मताचे नको असे सांगताना काही मंडळी फक्त पोस्टरबाजी करत असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली. याचबरोबर या रेल्वेमुळे शेतकरी विद्यार्थी उद्योजक युवक यांना भविष्यात मोठी संधी मिळणार असून हा लढा साईबाबांच्या श्रद्धा आणि समोरच्या मार्गाने आहे. साईबाबा नेहमी सत्याच्या पाठीमागे असतात मात्र काही लोकांना संगमनेरची प्रगती पहावत नसल्याने ते अडचणी निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली

यावेळी प्रा हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे, छात्र भारतीचे अनिकेत घुले, डॉ कोल्हे, अमर कतारी, विश्वासराव मुर्तडक, सिताराम राऊत, उत्कर्षाताई रूपवते, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली.

या आंदोलनासाठी हजारो नागरिक नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या गांधी टोप्या घालून आंदोलनामध्ये हजर होते. प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी संगमनेर तालुक्यातील व शहरातील हजारो नागरिक महिला युवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सत्यजित तांबे यांना अटकेची बातमी कळताच आंदोलन आक्रमक

नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. संगमनेर, सिन्नर नारायणगाव आळेफाटा चाकण या सर्व ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सर्व माध्यमांनी घेतली. केंद्र सरकारपर्यंत या आंदोलनाची धग पोहोचल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांना अटक करण्यात आली ही बातमी माध्यमांवर झळकल्यानंतर संगमनेर मधील आंदोलकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. याचबरोबर आंदोलन स्थळी कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की संघर्ष आमच्या रक्तात आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आम्हाला लाभला असून अटकेची भीती आम्हाला नाही. सरकारने न्याय बुद्धीने काम करावे. हे आंदोलन जनतेचे असून रेल्वे मार्ग सरळ झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित हजारो तरुणांची आक्रमकता पाहून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,डॉ. जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे या सर्वांनी आंदोलकांना शांत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button