अकोले तालुक्यातील अभयारण्य व धरणग्रस्त जनतेचे प्रश्न सोडवू – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

अकोले(प्रतिनिधी )
अकोले तालुक्यातील धरणग्रस्त, अभयारण्य ग्रस्त जनतेच्या विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्या समवेत बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोले तालुका धरणग्रस्त आणि अभयारण्य बाधित तसेच अकोले तालुक्यातील पाणी वंचित जनतेची संघर्ष समितीच्या सुकानू समितीला दिली आहे.
संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कडे तशी मागणी केली होती. 27 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली बैठकीचे आयोजन करण्या बाबतचे पत्र न मिळाल्यास 28 सप्टेंबर पासून पेसा अभ्यासक नागसेन पवार आणि आदिवासी सेवक जयराम इदे हे बेमुदत उपोषणास बसतील असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
संघर्ष समितीच्या ॲड दिलीप निगळे,आदिवासी सेवक जयराम इदे, वन कायदा अभ्यासक डॉ. भाऊराव उघडे,शेणित चे सरपंच गोविंद करवंदे, विठ्ठल जोशी, चिंधु गभाले, नामदेव धिंदळे, भागाजी तळपे, उत्तम भारमल, बाळू लोहकरे, शंकर आढार, सचिन धोंगडे, विठ्ठल गभाले,सेवा निवृत्त वनाधिकारी बबनराव वाघ,
किसन तळपे,आकाश साबळे आदी कार्यकर्त्यांनी शिर्डी येथे सोमवार, दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच मुख्यता पैसा क्षेत्रातील 106 गावे, पाणी प्रश्न, धरण ग्रसतांचे प्रश्न तसेच इको सेन्सेटिव्ह झोन मुळे निर्माण होणारे प्रश्न यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार वाकचौरे दिल्ली येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इको सेन्सिटिव्ह झोन प्रश्ना बाबत चर्चा केली तसेच मुख्यमंत्र्यां बरोबर शिष्ट मंडळाची बैठक घडवून आणन्याची ग्वाही दिली.
अकोले तालुक्यात भंडारदरा निळवंडे व इतर धरणे असून प्रवरा नदी अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. परंतु याच अकोले तालुक्यातील 106 पेसा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यांचा पाणी प्रश्न सोडवावा, निळवंडे, भंडारदरा धरणाच्या हक्काचे अकोले तालुक्याला मिळावे, भंडारदरा बुडीत क्षेत्रातील ९ गावांचे पूर्णवसनाचे प्रश्न सोडवावेत, धरणात बुडीत बंधारे व्हावेत,कळसुबाई – व हरिचंद्र गड अभयारण्य क्षेत्रातील सुशिक्षित तरुणांना पर्यटन व्यवसायासंबंधी प्रशिक्षण मिळावे तसेच पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसाह्य द्यावे,पर्यावरण संवेदन शील क्षेत्रातील प्रश्न सोडवावेत,तसेच
आश्रम शाळा , वसतिगृहे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,महाविद्यालये यांना भौतिक सोयी सुविधा मिळाव्यात,
अकोले तालुक्यातील प्रत्येक वाड्यापाड्या पक्के आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते बांधण्यात यावेत,प्रत्येक वाडी वाडीला नियमित बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अभयारण्य क्षेत्रातील सर्व गावांना 24 तास वीज पुरवठा केला जावा, बिगर आदिवासींनी आदिवासीच्या घेतलेल्या जमिनी परत मिळाव्यात आदी मागण्यांचा संघर्ष समितीच्या निवेदनात समावेश आहे.



