नेप्ती विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वोत्तम– विलास जपकर

अहिल्यानगर: प्रतिनिधी-
नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री .स्वामी आण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी परिसरात आनंद, उत्साह आणि स्वागताचा अनोखा सोहळा रंगला. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत प्रेमाने स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
. . सजविलेला शाळा परिसर, फुलांनी नटलेले प्रवेशद्वार, शिक्षकांचे प्रेमळ स्वागत आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच एकनाथ जपकर होते. यावेळी माजी सरपंच दिलीप होळकर संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन होळकर ,सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, हनुमंत साळवे ,माजी चेअरमन विकास जपकर, प्रभारी मुख्याध्यापक बाबा भोर, नानासाहेब घोडके ,राजेंद्र झावरे, गोरक्ष कोतकर, शिवाजी जाधव संतोष खरमाळे, बाबूलाल सय्यद , सविता कोरडे ,राधा वामन यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .
ग्रामीण भागातील शाळा आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये कोणत्याही खासगी शाळांपेक्षा कमी नाहीत. शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. अनुभवी शिक्षक, डिजिटल शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे शाळांचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गावातील शाळांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. नेप्ती विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वोत्तम असून गावातील पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवू नये असे आवाहन माजी चेअरमन विलास जपकर यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आपल्या गावातील शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांना बाहेरील शाळांमध्ये पाठविण्याऐवजी स्थानिक विद्यालयात प्रवेश देऊन शाळा सक्षम करण्यासाठी प्रत्येक पालकाने पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम केल्यास गावातील शाळा आदर्श शाळा म्हणून राज्यात ओळख निर्माण करू शकते. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्याची ताकद या शाळांमध्ये असून त्यासाठी सर्वांनी विद्यालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. पालकांनीही शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत विद्यालयाविषयी विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदमय आणि प्रेरणादायी वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या स्वागताचा हा सोहळा नेप्ती गावातील शिक्षणाविषयीची जागरूकता आणि शाळेबद्दलचा वाढता विश्वास अधोरेखित करणारा ठरला. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने दर्जेदार शिक्षण घेऊन प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करावी, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.



