नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वे मूळ संकल्पित मार्गानेच व्हावी अन्यथा जन आंदोलन -दशरथ सावंत

भाऊसाहेब वाकचौरे
अकोले दि 2 – नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मूळ संकल्पित मार्गानेच व्हावी यासाठी अकोले संगमनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रचंड मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा अकोले तालुक्याचे शेतकऱ्यांचे नेते श्री दशरथ सावंत यांनी दिला आहे
येत्या काही दिवसात त्यांच्या मूळ गावी रूभोडी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याच्या दृष्टीने झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली
यावेळी श्री सावंत म्हणाले की नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेची मागणी फार जुनी आहे त्यावेळी खेड ते नाशिक या मार्गावरील खासदारांनी व आमदारांनी हा प्रश्न त्या काळात लावून धरला होता मधल्या काळातही विद्यमान खासदारांनी नाशिक- पुणे रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने संसदेत लावून धरली हा रेल्वे मार्ग 2012 ला मंजूर असून त्याचा सर्वे झाला मात्र येत्या काही वर्षात हा विषय ऐरणीवर आल्याने तीनही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा व गावांचा जिव्हाळ्याचा विषय असून जनता या प्रश्नाच्या सोडवण्यासाठी आसुसलेली आहे

मात्र सरकारची याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका नसल्याने अकोले संगमनेर तालुक्यात संभ्रम तयार झाला आहे याबाबत या विभागाचे नेतृत्व करणारे आमदार खासदार यांनीच शासन पातळीवर काय निर्णय झाले त्याचे स्पष्टीकरण जनतेत येऊन द्यावी शासन प्रतिनिधी म्हणून सरकारमधून याबाबत माहिती आणावी नाशिक पुणे महामार्ग लगत सह्याद्रीच्या पट्ट्या लगत जाणारा नाशिक पुणे रेल्वे मार्ग आहे संकल्पित मूळ रेल्वे मार्गाचे आमदार खासदारांनी या प्रश्नावर आक्रमकपणे नेतृत्व करावे व जनतेचा अनेक पिढ्यांचा प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवा रेल्वे मार्गामुळे अकोलेचा ग्रामीण भाग आदिवासी भाग शहरांजवळ येणार आहे
त्याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने नव्या पिढीला पुण्यासारख्या शहरात शिक्षणासाठी नोकरीसाठी वेळेत जाता येईल नाशिक ते खेड ह्या संकल्पित मूळ रेल्वे मार्गावरील खासदार आमदारांनी व भविष्यात होणाऱ्या आमदारांनी या प्रश्नाचा लेखा जोखा जनतेपुढे मांडावा अन्यथा अकोले संगमनेर तालुक्याच्या जनतेचे वतीने प्रचंड मोठे जनआंदोलन उभा करण्याचा इशारा श्री सावंत यांनी दिला आहे



