अहमदनगरग्रामीण

संगमनेर तालुक्यात वादळी वार्‍यासह जोर दार पाऊस .

संगमनेर /प्रतिनिधी
आज गुरुवारी दि ९ रोजी दुपारनंतर संगमनेर तालुक्यात वादळी वार्‍यासह जोर दार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. वादळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे विजेचे पोल् उन्मळुन पडले. शेतकर्‍यांच्या घरांचे पत्रे, शेड, गोठे, पॉली हाऊस, रोप वाटीकांचे आच्छादन वादळाने उडून गेले. या वादळी पाऊस व गारपीटीमुळे तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक झाडे विजेच्या पोलवर तुटून पडल्याने व अनेक विजेचे पोल उन्मळून पडल्याने शहरासह अनेक ठिकाणी विजेची बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे आजची रात्र अंधारात काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्याचे समजते. तर शेजारील सिन्नर तालुक्यात वीज पडून एका विवाहीत महिलेचा मृत्यू झाला आहे.अनेक दिवसांची प्रतीक्षा लागून राहिलेल्या मान्सूनचे आज जोरदार आगमन झाले. मात्र मान्सूनने आपल्या आगमनासोबत प्रचंड वादळ घेऊन आल्याने पाऊसापेक्षा या वादळाने प्रचंड नुकसान केले. वादळी पावसाने अवघ्या एक ते दीड तासात दाणादाण उडवून टाकली. तालुक्यातील साकूर येथे वाघवाले वस्तीवरील अलीभाई रज्जाक मोमीन यांचे रोपवाटीकेवरील शेडनेटचे पूर्ण आच्छादन वार्‍याने उडून गेले. तालुक्यातील घुलेवाडी पंचक्रोशीत अती वेगवान वाहणार्‍या वार्‍यासोबत मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यात मोठमोठी झाडे मुळासोबत उन्मळुन पडली. नागरिकांच्या घराचे पत्रे वार्‍याने उडून गेले. शेतातील उभ्या पीकांचे नुकसान झाले. तालुक्यातील खांडगाव, झोळे, रायते, वाघापूर, कोल्हेवाडी या परिसरातही वादळी पाऊस झाला आहे. याठिकाणी या वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. कौठे मलकापूर परिसरही पावसाने झोडपून काढला आहे. याठिकाणी अन्वरभाई हुसेन शेख यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. यावेळी घरातील कुटूंब सावध होऊन घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच येथील माध्यमिक शाळेवरील सोलर पॅनल वार्‍याने उडून गेले आहेत. जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने जनावरे उघड्यावर पडले आहेत.

तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणाऱ्या मुंजेवाडी शिवारात वादळी वाऱ्यात भिंत अंगावर पडून तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की ,मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. दुपारी अचानक जोरदार वादळी वारे व गारांचा पाऊसही पडु लागला त्यामुळे दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले होते. परंतु अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले तर त्याच दरम्यान घराच्या भिंतीही पडल्या या भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय ६७) साहील पिना दुधवडे (वय १०) हे जागेवरच मयत झाले. तर वनिता पिना दुधवडे ( वय ८) ,मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय७०) हे जखमी झाले आहेत.

संगमनेर शहरातही दुपारी अचानक सुसाट्याचे वारे वाहू लागल्याने एकच धावपळ उडाली. काही वेळातच मुसळधार पाऊसही कोसळला. शहरातील मालदाड रोड, नवीन नगर रोड, गोल्डन सिटी, अकोले बायपास, जोर्वे रोड, शासकीय विश्रामगृह, नाशीक रोड परीसर यांसह अनेक भागात झाडे पडले असून अनेक फांद्या रस्त्यावर तुटून पडल्या आहेत. नेहमीप्रमाणे शहरातील बत्ती तात्काळ गुल झाली आहे. एकुणच या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली असून प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. सायंकाळी सहा वाजता पाऊस थांबला असला तरी ढग भरलेले असल्याने रात्री पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुक्यासह शेजारील अकोले तालुक्यातही अनेक भागात वादळी पाऊस कोसळला आहे.दुपारपर्यंत प्रचंड ऊन असल्याने अनेक वाहनचालकांनी झाडाच्या सावलीखाली गाड्या लावलेल्या होत्या. परंतु दुपारून आलेल्या वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

एकूणच संगमनेर शहर व तालुक्यात वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. यात खासगी मालमत्तेसह मोठ्या प्रमाणावर शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्वाधीक फटका शेतकर्‍यांना बसला आहे. महसूल प्रशासनाने तात्काळ या नुकसानीचा पंचनामा कराव अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह अनेक मोठमोठ्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. या झाडांमुळे येथील वातावरण प्रसन्न राहते तसेच अनेकविध पक्षांचे जणू ते माहेरघर आहे. परंतु आजच्या या पावसाने येथील अनेक मोठमोठी झाडे पडली आहेत. झाडांबरोबरच विजेचे खांब, तारा देखील तुटल्या आहेत. या पडलेल्या झाडांमुळे येथे येण्याजाण्यास अडचण होत आहे. प्रशासनाकडून ही झाडे बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button