योगेश नवले यांना कृषीथॉन 2025 चा ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’ जाहीर

एस के जाधव
कोकणवाडी (अकोले) प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील इंदोरी येथील युवक योगेश नवले यांना ‘कृषीथॉन 2025’ मधील ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
युवकांचा शेतीतील सहभाग वाढावा या उद्देशाने ‘ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन’ व ‘मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 1998 पासून ‘कृषीथॉन’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते.
यावर्षी या प्रदर्शनाच्या 18 व्या आवृत्तीचे आयोजन नाशिक येथील ठक्कर्स डोम येथे 13 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे.
या प्रदर्शनादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी राज्यभरातून निवड झालेल्या कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे सुपुत्र तसेच बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन येथे कार्यरत असलेले सह जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश नवले यांची निवड झाली आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ञांकडून आणि समाजातील विविध स्तरांतून योगेश नवले यांच्या निवडीचे कौतुक होत असून, हा सन्मान त्यांच्या प्रयोगशील व लोकाभिमुख कृषी विस्तार कार्याची पावती असल्याचे मत कृषी जाणकारांनी व्यक्त केले आहे.



