नेवासा तालुक्याला अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईला मुहूर्त मिळेना!

शेतकऱ्यांमध्ये संताप, आता थेट अर्धनग्न आंदोलनाचा इशारा!
नेवासा प्रतिनिधी|
2025 च्या अतिवृष्टीला जवळपास महिने उलटले, पंचनामे झाले, यादी लागली… पण तरीही नेवासा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही! तहसील कार्यालयातील भोंगळ, निष्क्रिय आणि बिनकामाचा कारभार याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या पोटावर होतो आहे, असा थेट आरोप करण्यात आला आहे.
शेतकरी भरपाईची वाट पाहत असताना प्रशासन मात्र ढिसाळपणे काम करत असल्याने संताप अनावर झाला असून, आज जीवन ज्योत फाऊंडेशन, छावा मराठा संघटना यांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक, नेवासा यांना देण्यात आले.
निवेदनात स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे —
“वंचित शेतकऱ्यांची भरपाई येत्या ४ दिवसांत खात्यात जमा झाली नाही, तर तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन उभं राहील! कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल.”
अतिवृष्टीमुळे कपाशी, तुर, बाजरी, मका, फळबाग यांचं मोठं नुकसान झालं. पंचनामे झालेच, पण आता 30 दिवस उलटले तरीही भरपाई मिळाली नाही. शेतकरी अडचणीत असताना तहसील कार्यालयातील हलगर्जीपणा व उदासीनता याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, कृषी मंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अहमदनगर यांनाही पाठवण्यात आले आहे.
निवेदनावर कमलेश नवले पाटील, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र नवथर (सर), राहुल कांगुणे,अक्षय बोधक, आप्पासाहेब अरगडे, अभिजीत बोधक,यांच्या सह्या असून, संघटनेने प्रशासनाला अंतिम अल्टिमेटम दिला आहे.



