इतर

माझी स्मरणगाथा’ अकोले तालुक्याच्या इतिहासाची अभ्यासपूर्ण बखर : डॉ. संदीप सांगळे

अकोले, दि.१६ (प्रतिनिधी) — 

‘माझी स्मरणगाथा’ हे पुस्तक अकोले तालुक्याच्या इतिहास, समाजजीवन, संस्कृती आणि परिवर्तनाचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरणार असून इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी आणि संशोधकांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ ठरेल, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी व्यक्त केली.

अकोले तालुक्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा वेध घेणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे लिखित ‘माझी स्मरणगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी अकोले महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सांगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चपराक प्रकाशक व ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील होते.

प्रारंभी अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. संदीप सांगळे, प्रकाशक घनश्याम पाटील, साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते ‘माझी स्मरणगाथा’चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, ज्याला अकोले तालुका समजून घ्यायचा आहे आणि ज्याच्या मनात या तालुक्याविषयी आस्था आहे, त्याने हे पुस्तक आवर्जून वाचावे. अकोले तालुक्यातील पर्यटनाला चालना देतानाच तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात प्रकाशक घनश्याम पाटील यांनी ‘माझी स्मरणगाथा’ हे पुस्तक म्हणजे अकोले तालुक्याचा इतिहासाचे संदर्भ मूल्य असणारे पुस्तक असल्याचे सांगितले. तालुक्याच्या विविध पैलूंचा दस्तऐवजीकरणाच्या माध्यमातून घेतलेला हा वेध भावी पिढ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शांताराम गजे, प्रा. एस. झेड. देशमुख, साहित्यिक संदीप वाकचौरे, सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक भाऊसाहेब गायकर, इंजि.अक्षय आरोटे आणि कु. वीरा कालेहर यांनी मनोगते व्यक्त करून ‘माझी स्मरणगाथा’च्या लेखनाचे आणि तालुक्याच्या इतिहासाच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.

पुस्तकास सुंदर छायाचित्रे देऊन बहुमोल सहकार्य केल्याबद्दल प्रेस फोटोग्राफर राजेंद्र मालुंजकर, विलास तुपे व प्रा.सुनील वलवे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुस्तकाचे लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रुपाली आरोटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर हासे यांनी केले, तर आभार डॉ. श्रावणी आरोटे यांनी मानले. तालुक्याचा इतिहास, साहित्य, शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने प्रकाशन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे,अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सतिश नाईकवाडी,  अॅड. वसंतराव मनकर, अॅड. के. बी. हांडे, महेश नवले, इंजि.नानासाहेब खर्डे,संपतराव नाईकवाडी,  माधव तिटमे,प्रकाश टाकळकर,भाऊसाहेब चासकर, भाऊसाहेब कासार, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

=======

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button