नेप्ती विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी बाबा भोर यांची नियुक्ती

विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी भोर सर यांनी प्रयत्न करावेत – उपसरपंच एकनाथ जपकर
अहिल्यानगर: प्रतिनिधी-
नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री. स्वामी आण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापकपदी बाबा लक्ष्मण भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेच्या सर्वोच्च शैक्षणिक पदावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच एकनाथ जपकर, संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन होळकर व रामदास फुले यांच्या हस्ते नवे प्रभारी मुख्याध्यापक बाबा भोर सर यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच दिलीप होळकर , संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन होळकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, हनुमंत साळवे ,माजी चेअरमन विलास जपकर, प्रभारी मुख्याध्यापक बाबा भोर ,नानासाहेब घोडके, राजेंद्र झावरे, संतोष खरमाळे, बाबुलाल सय्यद , राधा वामन, सविता कोरडे शिक्षक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बाबा भोर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. आर्थिक अडचणींवर मात करत मिळेल ते काम करून त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली होती. शिक्षणाची जिद्द, परिश्रमाची तयारी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी कला शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
भोर सर यांचा जीवनप्रवास हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले, संघर्ष केला आणि आज ते ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून घडले त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाले आहेत. हे यश केवळ त्यांचे नसून संपूर्ण नेप्ती गावासाठी अभिमानाची बाब आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर कोणतीही उंची गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे बाबा भोर आहेत. नेप्ती विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी बाबा भोर सर यांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन उपसरपंच एकनाथ जपकर यांनी केले.
पुढे बोलताना जपकर म्हणाले, “नेप्ती विद्यालयाच्या विकासासाठी भोर सरांचे योगदान मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविणे, सांस्कृतिक व कलाक्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि शाळेची शैक्षणिक परंपरा अधिक सक्षम करणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालय नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे विद्यालयाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल. संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्श ठरतात. बाबा भोर यांनी कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते. शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि विद्यार्थ्यांशी असलेली आत्मीयता ही त्यांच्या यशाची खरी ताकद आहे.”
भोर यांच्या नियुक्तीमुळे नेप्ती विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम बनविण्याचे कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



