नेप्तीत मोहरम निमित्ताने हिंदू -मुस्लिम सलोखा,

वरूणराजासाठी सर्वधर्मीयांची आळवणी.
मोहरम एकतेचे प्रतीक — प्रा. एकनाथ होले,
अहिल्यानगर: प्रतिनिधी
नगर तालुक्यातील नेप्ती येथे मोहरमच्या निमित्ताने गावात धार्मिक श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले. नालसाब, इमामी कासम, मौला अली यांच्यासह ताबूतांचे पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात आली . यावेळी गावातील हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिक, युवक आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने होती. सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित सहभाग घेत एकोपा आणि बंधुभावाचा संदेश दिला.
यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मोहरमच्या कार्यक्रमात सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. “सर्वांच्या शेतात भरघोस पीक यावे, जनावरांना चारा-पाणी मिळावे आणि गावात सुख-समृद्धी नांदावी,” अशी भावनिक प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगामुळे धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक संवेदनशीलतेचीही जोड मिळाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मौलाना मुनीर सय्यद आणि हुसेन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील हिंदू-मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन सवाऱ्यांची स्थापना केली . स्थापनेच्या दिवशी नाले हैदर यंग पार्टीच्या वतीने इमामवाडा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबतचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानातून सत्य, न्याय आणि मानवतेसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नेप्ती गावात अनेक वर्षांपासून सर्व धर्मीय बांधव परस्पर स्नेह, विश्वास आणि आदराच्या भावनेतून एकत्र राहत आहेत. मोहरमसारख्या धार्मिक पर्वातून समाजात बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याचे समाधान वाटते. मोहरमचा संदेश म्हणजे त्याग, मानवता व सर्वधर्मसमभाव आहे.नेप्तीचे मोहरम सामाजिक एकतेचे प्रतीक आहे असे प्रा. एकनाथ होले यांनी म्हटले
ते पुढे म्हणाले, “आज समाजात एकता आणि माणुसकी जपण्याची गरज अधिक आहे. धर्म, जात आणि पंथ यापलीकडे जाऊन आपण सर्वांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. पावसासाठी सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन केलेली प्रार्थना ही आपल्या गावातील सामाजिक ऐक्याची ताकद दर्शवते. नेप्तीची ही परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
माजी उपसरपंच फारुक सय्यद यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नेप्ती गावात इतर सर्व धार्मिक उत्सव परस्पर सहकार्याने साजरे करण्याची गौरवशाली परंपरा आहे. गावातील हिंदू-मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन मोहरमचे आयोजन केल्यामुळे सामाजिक ऐक्य अधिक बळकट झाले आहे. आजच्या कार्यक्रमातून बंधुता, शांतता आणि एकोप्याचा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचला आहे. गावातील युवकांनी दाखविलेली एकजूट हीच नेप्तीची खरी ओळख असून भविष्यातही ही परंपरा अधिक बळकट होईल.”
नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच फारुक सय्यद व प्रा. एकनाथ होले यांच्या हस्ते सवारीला चादर अर्पण करून पावसासाठी सामूहिक साकडे घालून प्रार्थना करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच फारुक सय्यद, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले ,माजी उपसरपंच दादू चौगुले, मौलाना मुनीर सय्यद, प्रा. एकनाथ होले,सलीम सय्यद ,हुसेन सय्यद, परवेज सय्यद, भूषण पवार ,लौकिक चौगुले, सादिक पवार ,संजय राऊत , प्रभाकर चहाळ, संतोष चहाळ , रमेज सय्यद, वसीम सय्यद ,साहिल सय्यद, बाबूलाल सय्यद, जावेद सय्यद, जमीर सय्यद, गुलाब सय्यद, उमर सय्यद, युनूस सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, मुख्तार सय्यद, कय्युम सय्यद, बादशाह सय्यद, वाजिद सय्यद, अन्सार सय्यद, बबन सय्यद, रफिक सय्यद, आसिफ शेख, इमरान सय्यद ,नसीर सय्यद ,नितीन पवार हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . . .


