रेशनच्या धान्याची व शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासा – रामदास फुले

अहिल्यानगर : प्रतिनिधी —
अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी असून लाभार्थ्यांना निकृष्ट व खराब धान्य मिळत असल्याने या प्रकरणाची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केली आहे.
तसेच गरजू व सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळीची गुणवत्ता आणि भोजनाच्या दर्जाचीही संबंधित विभागामार्फत तपासणी करण्यात यावी, तसेच रेशन कार्डसह ऑनलाइन प्रक्रिया गतिमान करावी तसेच गॅस वितरण सुरळीत करा अशी मागणी त्यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रामदास फुले यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन या मागण्यांचे निवेदन सादर केले.
रेशनच्या धान्याचा दर्जा हा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने धान्य वितरणापूर्वी त्याची योग्य तपासणी होणे आवश्यक आहे. निकृष्ट किंवा खराब धान्य लाभार्थ्यांच्या वाट्याला येत असल्यास संबंधित यंत्रणेने त्याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
त्याचबरोबर शिवभोजन थाळीच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, तयार करण्याची पद्धत तसेच भोजनाच्या दर्जाची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे फुले यांनी निवेदनात नमूद केले. संबंधित विभागाने अचानक तपासणी करून वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“रेशन दुकानातून मिळणारे धान्य हे गरीब व गरजू नागरिकांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र लाभार्थ्यांना निकृष्ट व खराब धान्य मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष रेशन दुकानांवर जाऊन धान्याची गुणवत्ता तपासावी. नागरिकांना चांगल्या दर्जाचे व सुरक्षित धान्य मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या हक्काशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होता कामा नये,” असे रामदास फुले यांनी सांगितले.
“शिवभोजन थाळी ही गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना दर्जेदार, स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचे भोजन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांवर भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची नियमित तपासणी करावी. रेशन धान्य आणि शिवभोजन थाळी या दोन्ही बाबी जनतेच्या हिताशी निगडित असल्याने शासनाने तातडीने दखल घेऊन प्रभावी तपासणी यंत्रणा राबवावी,” अशी मागणीही फुले यांनी केली.
यावेळी प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, अनिल निकम, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष भरत गारुडकर, समता परिषदेचे नेते रामदास फुले, सोमनाथ धाडगे , ब्रिजेश ताठे, अभिषेक चिपाडे, वसंत रांधवन , युवराज हजारे, संतोष हजारे, बबनराव घुमटकर, रामदास लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



