सहकार

थोरात कारखान्याचे 11 लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट – बाळासाहेब थोरात



थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न…

संगमनेर (प्रतिनिधी) –

पारदर्शक कामकाज व गुणवत्ता यामुळे थोरात कारखान्यावर सभासद ,शेतकरी व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. अगदी 200 किमी लांबीवरून ऊस आणून आपण चांगला भाव दिला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात कमीत कमी 9 लाख मेट्रिक टन ऊस निर्माण होणे गरजेचे आहे. यावर्षी ऊस क्षेत्र वाढवण्याबरोबर एकरी टनेज वाढवण्यासाठी काम करणे गरजेचे असून या हंगामात कमी दिवसात जास्त गाळप करताना 11 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026- 27 या वर्षीच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा आमदार डॉ सुधीर तांबे, सौ कांचनताई थोरात, ॲड माधवराव कानवडे, व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले ,बाबा ओहोळ, डॉ जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी ,आर बी राहणे, के के थोरात, अजय फटांगरे , संचालक संपतराव गोडगे, विनोद हासे ,सतीश वर्पे ,रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे ,नवनाथ आरगडे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजणे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री व सौ शोभाताई दिलीप नागरे ,श्री व सौ दिपाली योगेश भालेराव ,श्री व सौ अरुणा विजय राहणे ,श्री व सौ कमलताई मदन आंबरे ,श्री व सौ नंदाताई बंडू नाना भाबड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी बोलताना मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श विचार आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने कारखान्याची वाटचाल यशस्वी सुरू आहे. शेतकऱ्यांचा, सभासदांचा मोठा विश्वास कारखान्यावर आहे .यावेळेस कमी वेळेत जास्त गाळप करावे लागणार आहे .कालखंड कमी आहे हे मोठे संकटाचे उदाहरण आहे.या हंगामात अडचणी खूप आहेत. 15 ऑक्टोबरला सरकारने कारखाना सुरू करण्यास सांगितले आहे.पाऊस नाही, शेतकऱ्यांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा झाला आहे .पाणी पुढे वाहून चालले आहे. पाणी व विजेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. ९ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यासाठी विस्तारीकरणाचे काम करण्यात येणार आहे. दररोज ९ हजार मे टन गाळप होईल याकरता तयारी करावी लागणार आहे. चांगले गाळप झाले तर मोलासिस ,अल्कोहोल ,वीज निर्मिती  मधून मोठी मदत मिळते. म्हणून प्रत्येकाने पूर्ण क्षमतेने काम करताना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस क्षेत्र निर्माण होईल आणि एकरी उत्पादन वाढेल याकरता काम करावे.

याचबरोबर तालुक्यामध्ये 11 तास हक्काची लाईट मिळाली पाहिजे. ती मिळत नाही तरीही शेतकरी गप्प आहेत हे अत्यंत चिंतेची बाब आहे. हक्काची पाणी आणि विजेसाठी आपण आवाज उठवला. डॉ जयश्रीताई थोरात यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कालपासून वीज सुरळीत करण्यात आली याचा अर्थ पुरवठा जाणून-बुजून खंडित केला जातो. याबाबत आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे.

यावर्षी संपूर्ण जगामध्ये देशात आणि राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. पृथ्वी वेगळ्या अवस्थेतून जात आहे. आपल्याला काळजी करावी लागणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही ही चिंतेची बाब आहे. आपल्या कार्यकाळामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा पिक विमा मिळाला. शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी आपण  लक्ष घालणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

तर मा आ.डॉ तांबे म्हणाले की, कारखान्याचे चांगले व्यवस्थापन हे आदर्शवत आहे .सुदैवाने यावर्षी धरणे भरले आहेत .पाऊस नाही. २०  टीएमसी पाणी आपल्याकडे आहे. परंतु त्याचे  चांगले  नियोजन होत नाही .शेतकरी बेवारस पडला आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याची टीका त्यांनी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



त्यांचे राजकारण फ्लेक्सचे तर आपले मेहनतीचे

आपण सातत्याने मेहनत करतो सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करतो. केलेल्या कामाची कधीही फ्लेक्सबाजी केली नाही. मात्र सध्या काम न करता फ्लेक्सबाजीचे राजकारण सुरू आहे. त्यांचे राजकारण फ्लेक्सचे अशी नाव न घेता टीका करताना यावर्षी शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी आपण लक्ष घालणार आहोत असे मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले असून आपल्या कार्यकाळात कायम शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळाला. मात्र आता तसे होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button