श्रमातून नि ज्ञानातून घडलेला माणूस दिशादर्शक ठरतो :- प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर

संजय उकिरडे /प्रतिनिधी
श्रीरामपूर – श्रमातून नि ज्ञानातून घडलेला माणूस दिशादर्शक ठरतो, आमचे महाविद्यालयीन मित्र ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पोरकेपण असूनही ध्यास आणि अभ्यासाने आपले जीवनशिल्प आकाराला आणले, आजच्या पिढीने त्यांचे साहित्य, शैक्षणिक चरित्र -चारित्र्य समजून घ्यावे, असे आवाहन अ. नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी व्यक्त केले.श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या शैक्षणिक, साहित्यिक योगदानाबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. मतकर यांनी सन्मान केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजीराव बारगळ, सेवानिवृत्त इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील खिलारी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर एक आदर्श व्यक्तिमत्त्व :- डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या सत्काराचा सार्थ आनंद व्यक्त करीत डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, प्राचार्य डॉ. मतकर यांच्याबरोबर श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्याल्यात, वसतिगृहात एकत्र शिक्षणाचा, वास्तव्याचा अनुभव मी घेतला आहे, मतकर परिवार अतिशय प्रेमळ व सेवाभावी आहे. पाचेगाव येथून मतकरांच्या घरून जेवणाचे डबे येत असत, त्यावेळी आम्ही म्हणजे मी, रामचंद्र जाधव, भागचंद औताडे, भगवान शिंदे, शिवाजी काळे असे अनेक मित्र एकत्र जेवत असू. या कष्टातून, शिक्षणातून आणि सहवासातूनच त्यावेळचे सर्व मित्र मोठमोठ्या पदावर प्रतिष्ठित राहिले पण एकमेकांना कधी विसरले नाहीत, प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर मुळातच अतिशय बुद्धिमान, कष्टाळू आणि माणुसकी संपन्न आहेत, एक आदर्श प्राचार्य म्हणून त्यांचा सार्थ गौरव वाटते, असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी आपली विविध पुस्तके देऊन प्राचार्य डॉ. मतकर यांचा सन्मान केला.
प्रा. शिवाजीराव बारगळ आपल्या सत्कारला उत्तर देताना म्हणाले, माणूस माणुसकी जोपासतो, तेव्हा तो इतरांना प्रेरक ठरतो. आमच्या समाजातील डॉ. मतकर हे सामाजिक भूषण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रा. डॉ. सुनील खिलारी यांनी प्राचार्य डॉ. मतकर, डॉ. उपाध्ये यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण सांगत मैत्रीभावना व्यक्त केल्या. प्राचार्य डॉ. मतकर यांनी आपल्या जीवनातल्या आठवणी सांगत कष्टातून,संयमातून, प्रामाणिक जगण्यातून, निर्मळ वागण्यातूनच जीवनाचा खरा आनंद मिळतो, डॉ. उपाध्ये यांचे कष्टमय, पोरके जीवन जवळून पाहत आम्हीही मनापासून शिक्षण घेतले. माजी विद्यार्थी स्नेहग्रुप च्या माध्यमातून अजूनही आम्ही एकत्र येतो, असे अनुभव सांगत आभार मानले.



